नागपूर : एकाकी आयुष्य जगणाऱ्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे. स्वदेश कुमार गुप्ता या ७१ वर्षीय वृद्धाचा मृतदेह राहत्या फ्लॅट मध्ये बुधवारी सापडला. दोन दिवसापासून हा मृतदेह तसाच घरात पडून होता. नागपूरच्या नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीतील सिद्धेश्वर नगर येथे सिद्धेश्वर अपार्टमेंट मध्ये स्वदेश कुमार गुप्ता सुमारे १० वर्षापासून राहत होते. गुप्ता यांना दोन मुले असून एक मुलगा भंडारा जिल्ह्यात तर दुसरा मुंबईला राहतो.
भारत सरकारच्या आयुध निर्माण फॅक्टरीमधून गुप्ता २००७ साली निवृत्त झाले होते. गुप्ता यांच्या पत्नीचे निधन १ वर्षापूर्वी झाले. त्यांनतर ते एकटेच आपल्या सदनिकेत राहत होते.
गुप्ता यांच्याकडील वर्तमान पत्र गेल्या दोन दिवसांपासून तसाच दारासमोर पडून राहिल्याने शेजाऱ्यांना शंका आली. ज्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला तेंव्हा गुप्ता याचा मृतदेह बाथरूम जवळ पडून होता. दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. घटनेनंतर गुप्ता यांच्या मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.
गुप्ता हे निवृत्ती नंतर चिडचिड करीत होते, ज्यामुळे मुलांसोबत त्यांचे पटत नसल्याची माहिती आहे. मात्र अशाप्रकारे वृद्धाचा एकाकी मृत्यू झाल्याने, वृद्धांच्या सामाजिक सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.