नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : बुधवारी आयआरबीचे वीरेंद्र म्हैसकर आणि इतर सतरा जणांच्या विरोधात सीबीआयने चार्जशीट दाखल केलं. मात्र चार्जशीट दाखल होताच, म्हैसकर आणि इतरांनी जामिनासाठी अर्ज करून जमीन घेतला.
बुधवारीच म्हैसकरांनी शेअर बाजार आणि सेबीला स्वतःची बाजू मांडणारं पत्रं दिलंय. त्यामुळं सीबीआय म्हैसकरांना वाचवण्याचा प्रयत्न करतंय असा गंभीर आरोप संदीप शेट्टी यांनी केला आहे. तसंच जमीन हडपण्याचा प्रयत्न करूनही एमएसआरडीसी त्याविरोधात काहीच कसं करत नाही असा सवाल विचारलाय.
म्हैसकर आणि त्यांच्या साथीदारांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शेकडो एकर सरकारी जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला असा ठपका आरोपपत्रात आहे. मात्र सीबीआय म्हैसकर आणि इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतंय असा आरोप दिवंगत आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांचे भाऊ संदीप शेट्टी यांनी केलाय. याबाबतची तक्रार सतीश शेट्टी यांनी केली होती. मात्र शेट्टी यांनी २००९ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीतली कलमं आणि सीबीआयच्या आरोपपत्रातील कलमं यात मोठा फरक आहे. सीबीआयने चार्ज शीट मध्ये दाखल केलेली कलमं सौम्य आहेत असा आआरोप संदीप यांनी केलाय.
आरोपपत्र दाखल झाल्यावर लगेचच म्हैसकर आणि इतर आरोपींना जामिनासाठी अर्ज केला. बुधवारीच म्हैसकर यांनी शेअर बाजार आणि सेबीला स्वतःची बाजू मांडणारं पत्रं दिलं. याचाच अर्थ सीबीआयच्या हालचालींची संपूर्ण माहिती म्हैसकर यांना होती असा आरोप संदीप यांनी केलाय.
हे जमीन घोटाळा प्रकरण आणखीही एका कारणाने महत्वाचं आहे. ते म्हणजे आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची हत्या. शेट्टी यांनीच हा जमीन घोटाळा माहिती अधिकारात उघडकीस आणला. त्याविरोधात लोणावळा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला. आणि याच दरम्यान त्यांची हत्या झाली. त्यामुळं या जमीन घोटाळ्यातच शेट्टी यांच्या हत्येचं कारण दडलं असल्याचं सीबीआयचं म्हणणं होतं. म्हणूनच सीबीआयने हायकोर्टाकडे मागणी करून हा तपास स्वतःकडे घेतला. पण यातून खरंच खऱ्या आरोपींना शिक्षा होणार का याबाबत आरटीआय कार्यकर्ते साशंक आहेत.
सतीश शेट्टी यांच्या हत्येला पुढील महिन्यात आठ वर्ष पूर्ण होत आहेत. तर, त्यांनी दाखल केलेल्या जमीन घोटाळ्याच्या गुन्ह्याला नऊ वर्ष पूर्ण झालीत. या दोन्ही गुन्ह्यात आरोपी एकच आहेत. आता एका गुन्ह्यात चार्ज शीट दाखल झालंय. दुसऱ्या गुन्ह्याचा तपास अजूनही सुरूच आहे. सीबीआयसारख्या तपास यंत्रणेकडे तपास असताना ही स्थिती आहे. त्यामुळंच आरोपींना खरंच शिक्षा होईल का... अशी शंका संदीप शेट्टी आणि आरटीआय कार्यकर्त्यांना वाटतेय. आणि ती रास्तही दिसतेय.