सांगली : सांगलीमध्ये मंगळवारी मध्यरात्री एक अतिशय निर्घृण हत्या करण्यात आलीय. पोलीस हवालदार समाधान मानटे यांचा धार धार शस्त्राने वार करुन खून करण्यात आलाय. मानटे यांच्या शरिरात तब्बल १८ वेळा भोसकण्यात आलंय. विश्रामबाग येथील कुपवाड रस्त्यावर हॉटेल रत्ना डिलक्सच्या जवळ मध्यरात्री मानटेंचा खून करण्यात आला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झालीय. हत्येनंतर सांगली शहरात एकच खळबळ माजली आहे. एका पोलिसाचीच हत्या झाल्यामुळे नागरिक धास्तावले आहेत.
पोलीस दलातील ३० वर्षीय समाधान मानटे यांचा धारदार हत्याराने १८ वार करून अमानुष खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हॉटेल रत्नामध्ये मंगळवारी रात्री सव्वा बारा वाजता ही घटना घडली. ही घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. यामध्ये दोन हल्लेखोर असल्याचे निष्पन्न झाले आहे.
समाधान मानटे मूळचे बीड जिल्ह्यातील आहेत. सांगली जिल्हा पोलीस दलात ते २०१३ मध्ये भरती झाले आहेत. मिरज शहर पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. त्यांच्याकडे वाहतूक कारवाईची जबाबदारी होती. ते विश्रामबाग पोलीस वसाहतीमध्ये पत्नीसह राहत होते. मंगळवारी रात्री काम संपवून घरी येत असताना ते रत्ना हॉटेलमध्ये गेले होते. काऊंटरवर दोघा ग्राहकांशी त्यांचा वाद झाला. त्यानंतर ते हॉटेल व्यवस्थापकाशी हॉटेलच्या आवारातच बोलत थांबले. तेवढ्यात वाद झालेले ग्राहक हॉटेलबाहेर निघून गेले. यातील एक जण गाडीतील धारदार हत्यार घेऊन आला. त्याने मानटे यांच्यावर सपासप १८ वार केले. यामध्ये मानटे रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मरण पावले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, गुंडविरोधी पथक, संजयनगर, विश्रामबाग, सांगली शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. मृत मानटे गणवेशात होते. मानटे यांच्या खुनाची घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतलं असून त्याआधारे पुढील तपास सुरू आहे. हॉटेलच्या व्यवस्थापकसह चार कामगारांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय.