'राजकारण असंतुष्ट आत्म्यांचा महासागर'; नितीन गडकरी स्पष्टच बोलले, 'इथे प्रत्येक माणूस...'

नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, 'आयुष्य हा तडजोडी, मजबुरी, अडथळे आणि विरोधाभासांचा खेळ आहे. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय किंवा कॉर्पोरेट जीवन असो, प्रत्येक ठिकाणी आव्हानं आणि समस्या आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला 'आर्ट ऑफ लिव्हिंग' समजून घ्यावे लागेल".   

शिवराज यादव | Updated: Dec 2, 2024, 06:28 PM IST
'राजकारण असंतुष्ट आत्म्यांचा महासागर'; नितीन गडकरी स्पष्टच बोलले, 'इथे प्रत्येक माणूस...'

ज्येष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारण असंतृष्ट आत्म्यांचा सागर आहे असं विधान केलं आहे. नितीन गडकरी म्हणाले की, "राजकारणात प्रत्येक व्यक्ती उदास आहे. प्रत्येक व्यक्ती नेहमी ज्या पदावर आहोत त्यापेक्षा जास्त महत्त्वाकांक्षा ठेवतो".  नितीन गडकरी नागपुरात '50 गोल्डन रूल ऑफ लाईफ' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. 

Add Zee News as a Preferred Source

"आयुष्य हा तडजोडी, मजबुरी, अडथळे आणि विरोधाभासांचा खेळ आहे. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय किंवा कॉर्पोरेट जीवन असो, प्रत्येक ठिकाणी आव्हानं आणि समस्या आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला 'आर्ट ऑफ लिव्हिंग' समजून घ्यावे लागेल", असं नितीन गडकरींनी सांगितलं. 

राजस्थानमधील आपल्या एका कार्यक्रमाचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की, "मी राजस्थान विधिमंडळाच्या एका महोत्सव कार्यक्रमात गेलो होतो. तिथे बोलताना असंच बोलून गेलो होतो. राजकारण असंतुष्ट आत्म्यांचा महासागर आहे. येथे प्रत्येक माणूस दु:खी आहे. नगरसेवक दु:खी आहे की त्याला आमदारकीची संधी मिळाली नाही. आमदार याकरता दुःखी आहे की त्याला मंत्री होता आलं नाही. जो मंत्री झाला तो याकरता दुःखी आहे की त्याला चांगलं खातं मिळालं नाही. आणि त्यानंतर तो याकरता दुःखी आहे की तो मुख्यमंत्री झाला नाही. मुख्यमंत्री याकरता तणावात आहे की हायकमांड कधी ठेवेल आणि कधी काढेल हे माहीत नाही".

समस्या हे फार मोठं आव्हान आहे. त्याला पार करुन पुढे जाणं हे आव्हान आहे असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या आत्मचरित्रातील एक वाक्य आठवते, ज्यात म्हटले आहे की, 'माणूस पराभूत होतो तेव्हा तो संपत नाही. जेव्हा तो हार मानतो तेव्हा तो संपतो".

युद्धभूमीवर हारल्यावर कोणी संपत नाही. पण युद्धभमी सोडून जातो तेव्हा संपतो असं नितीन गडकरींनी अधोरेखित केलं. "सुखी जीवनासाठी चांगली मानवी मूल्यं आणि संस्कारांची गरज आहे असंही गडकरींनी सांगितलं. तसंच जीवन जगण्याचे आणि यशस्वी होण्याचे सोनेरी नियम सांगतानाच त्यांनी 'व्यक्ती, पक्ष आणि पक्ष तत्त्वज्ञानाचे महत्त्वही अधोरेखित केले.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More