पंकजा मुंडे आणि खडसे नाराज नाहीत -चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांचा दावा

Updated: Dec 11, 2019, 03:00 PM IST
पंकजा मुंडे आणि खडसे नाराज नाहीत -चंद्रकांत पाटील title=

मुंबई : पंकजा मुंडे उद्याच्या गोपीनाथ गडावरील मेळाव्यात सारं काही स्पष्ट करतील. प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण देखील उपस्थित राहणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात बोलत होते. १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे या आपली भूमिका मांडणार आहेत. यासाठी त्या मुंबईहून परळीला रवाना झाल्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला नेहमी उपस्थित राहत असलेले नेते उपस्थित राहतील असंही त्यांनी सांगितलं आहे. तसंच उद्याचा कार्यक्रम राजकीय नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच एकनाथ खडसे यांच्यासोबत कौटुंबिक चर्चा झाल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ खडसेंची भूमिका पक्षानं जाणून घेतली असून त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी भविष्यात शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येतील असं म्हटलं होतं. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटलांनी म्हटलं की, 'भाजप-सेनेची तीस वर्षांची मैत्री आहे. ती नैसर्गिक आहे. आमचं रक्त एकच म्हणजे हिंदुत्व आहे. चर्चेसाठी दरवाजे खुले आहेत असं म्हणण्यापेक्षा आम्हाला अहंकार नव्हता.' त्यामुळे असं काही होत असेल तर त्याचं स्वागतच असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे नाराज असल्य़ाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पक्षाने डावलल्याने एकनाथ खडसे नाराज आहेत. भाजपने एकनाथ खडसे यांच्या जागी त्यांच्या मुलीला तिकीट दिलं होतं. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर विधानसभा निवडणुकीत पक्षातील लोकांमुळेच पराभव झाल्याची भावना असल्याने पंकजा मुंडे या देखील नाराज आहेत. 

दुसरीकडे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील नेत्यांच्या कारस्थानामुळेच झाला आहे. असा खळबळजनक आरोप एकनाथ खडसेंनी काही दिवसांपूर्वी केला होता. तसेच पक्ष नेतृत्वाकडे याबाबतची तक्रार केली असून त्यावर कारवाई होईल असं देखील त्यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसे यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात आणखी चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडे भाजप नेते मात्र ते पक्षात राहणार असल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे आता दोघांच्या पुढच्या वाटचालीकडे कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागलं आहे.