मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आपल्या भाषणात मनातली खदखद व्यक्त करणार असल्याने अनेक नेत्यांच्या पोटात गोळा आला आहे. सुमारे 2 वर्षापेक्षा जास्तवेळ तुरुंगात घालवल्यानंतर बाहेर पडलेले छगन भुजबळ पहिल्यांदाच राजकीय व्यासपीठावरुन भाषण करणार आहेत. या भाषणात ते आपल्या मनातील बोलतील असं भुजबळ निकटवर्तीयांकडून सांगितलं गेल्याने अनेक नेत्यांच्या पोटात गोळा आला आहे असं समजतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने छगन भुजबळ पुण्यात भाषण करणार आहेत. न्यायालयाची विशेष परवानगी घेऊन भुजबळ पुण्यात दाखल झाले आहेत.
नुकत्याच झालेल्या नाशिक विधानपरिषद निवडणुकीत छगन भुजबळांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मदत केल्याचा दावा समोर आला आहे. शिवसेनेचे विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या विषयी पक्षात संभ्रमाचं वातावरण तयार झालं होतं. यावर भुजबळ आपल्या भाषणात खुलासा करतील असंही त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं आहे. तसंच तुरुंगवारी आणि त्यादरम्यान जामिनासाठी केलेल्या सर्व प्रयत्नांबाबतही भुजबळांकडून मत व्यक्त होऊ शकतं. महाराष्ट्राच्या राजकारणात छगन भुजबळांची प्रतिमा मराठा विरोधी आणि ओबीसी समर्थक अशी तयार झाल्याने त्यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. छगन भुजबळ यांना तुरुंगात जाण्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने वाचवलं नाही अशी भुजबळ समर्थकांची तक्रार आहे. त्यामुळे आपल्या भाषणात छगन भुजबळ समर्थकांच्या मनातला राग कसा शांत करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे प्रदीर्घ काळ ते तुरूंगात होते. अखेर जामीन मंजूर झाल्यावर भुजबळ कारागृहाबाहेर आले. दरम्यान, हल्लाबोल यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी भुजबळ पुण्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी महात्मा फुले वाड्यास भेट दिली. तसेच, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रिबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, अभिवादन केले. या वेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी भुजबळांशी संवाद साधला. या वेळी 'गेल्या काही दिवसांत विविध पक्षांचे नेते मला भेटण्यासाठी आले. त्या सर्वांचा मी आभारी आहे. मात्र, त्यांच्या भेटीमुळे मी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर जाणार की नाही, असे अनेक तर्कवितर्क सुरू झाले होते. परंतु, मी माझी पुढील भूमिका राष्ट्रवादीचच्या व्यासपीठावरच मांडणार आहे,' असे भुजबळ यांनी सांगितले.