'आम्ही सरकारमध्ये बसलो आहोत...', शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राणे कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया

Sindhudurg Shivaji Maharaj Statue Collapse: डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अनावरण करण्यात आलेला हा पुतळा अचानक सोमवारी दुपारच्या सुमारास कोसळल्याने एकच खळबळ उडाली. अवघ्या आठ महिन्यांमध्ये हा पुतळा कोसळल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात असतानाच राणे कुटुंबातून पाहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 27, 2024, 02:43 PM IST
'आम्ही सरकारमध्ये बसलो आहोत...', शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राणे कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया title=
राणे कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया आली समोर

Sindhudurg Shivaji Maharaj Statue Collapse: सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळल्यानंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेवर राजकीय प्रतिक्रिया समोर येत असतानाच आता या प्रकरणासंदर्भात सिंधुदुर्गमधील प्रमुख राजकीय घारणं असलेल्या राणे कुटुंबातील सदस्याने पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. पहिली प्रतिक्रिया नोंदवताना राणे कुटुंबियातील सदस्याने संयम राखल्याबद्दल शिवप्रेमींचे आभार मानले आहेत. दरम्यान, या प्रकरणामध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राणे कुटुंबाकडून कोणी नोंदवली प्रतिक्रिया?

सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरील पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं होतं. तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. हा पुतळा कोसळल्याची बातमी समोर आल्यानंतर राणे कुटुंबाकडून काय प्रतिक्रिया येते याबद्दल सोशल मीडियावर चर्चा होती. अनेक सोशल मीडिया पोस्ट खाली राणेंचं म्हणणं काय आहे असा प्रश्न विचारला जात होता. अखेर या प्रकरणावर माजी खासदार निलेश राणेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

आम्ही सरकारमध्ये बसलो आहोत

सिंधुदुर्गमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना निलेश राणेंनी घडलेला प्रकार दुर्देवी असल्याचं म्हटलं आहे. "जे घडलं आहे ते फार दूर्भाग्यपूर्ण आहे. असं व्हायला नको होतं. ज्याची चूक असेल त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे. कंत्राटदार असो किंवा अधिकारी असो त्यांच्यावर कारवाई करा अशी आमची मागणी आहे. आम्ही याचा पाठपुरावाही करु. आम्ही सरकारमध्ये बसलो आहोत. दोषींवर कठोर कारवाई नक्की केली जाईल," असं निलेश राणेंनी म्हटलं आहे. 

नक्की वाचा >> 'शिवरायांचा असा अपमान मुघलांनाही केला नाही'; राऊत कडाडले! मोदी, शिंदेंचा उल्लेख करत म्हणाले, 'सरकारच्या...'

आश्वासन दिलं

तसेच पुढे बोलताना निलेश राणेंनी, "हा पुतळा पुन्हा या ठिकाणी उभा करण्यासाठी जे काही करावं लागेल ते तातडीने केलं जाईल, हे आश्वासन मी तुम्हाला देतो," असंही म्हटलं आहे. या स्मारकाला दुर्घटनेनंतर भेट दिल्याचे फोटोही निलेश राणेंनी पोस्ट केले आहेत. "मालवण किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्णाकृती पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्याची अत्यंत वाईट घटना काल घडली. आज या पार्श्वभूमीवर किल्ले राजकोट येथे भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई सोबतच त्याच ठिकाणी पुन्हा भव्य दिव्य पुतळा लवकरात लवकर उभा राहणार," असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

हे स्मारक पूर्वीपेक्षाही

"महाराष्ट्र राज्य सरकार मधील जेष्ठ मंत्री दीपक केसरकर यांच्याशी आज चर्चा झाली. गंभीर्यता लक्षात घेता लवकरात लवकर या भव्यदिव स्मारकाच्या उभारणीसाठी सरकार युद्धपातळीवर काम करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. एक जॉइंट बैठक लावणार असल्याचं ही त्यांनी कळवले. छत्रपती शिवाजी महाराजांचं किल्ले राजकोट येथील स्मारक हे पूर्वीपेक्षाही भव्यदिव आणि महाराजांच्या व्यक्तिमत्वाला साजेस असेल," असं निलेश राणे म्हणाले.

शिवप्रेमींचे मानले आभार

याशिवाय निलेश राणेंनी राज्यातील सर्व शिवप्रेमींचे आभार मानले आहेत. "मी महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींचे आभार मानतो. फारच संताप आणणारी घटना घडली आहे. जे फोटोग्राफ समोर आले आहेत ते धक्कादायक आहेत. त्यानंतरही शिवप्रेमींनी जो संयम राखला आहे, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. जे घडलं ती साधारण घटना नाही. त्यानंतरही शिवप्रेमींनी ज्या पद्धतीने शांततेने, संयम दाखवला आहे तो खरोखरच कौतुकास्पद आहे. मी मनापासून त्यांचे आभार मानतो," असं निलेश राणे प्रसारमाध्यांशी बोलताना म्हणाले.