ऑस्ट्रेलियाने उभा केला धावांचा डोंगर, टीम इंडियाच्या डोक्यावर पुन्हा पराभवाची टांगती तलवार?

दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी मैदानात जोरदार फटकेबाजी करून तब्बल 405 धावांचा डोंगर उभा केला.

पुजा पवार | Updated: Dec 15, 2024, 02:26 PM IST
ऑस्ट्रेलियाने उभा केला धावांचा डोंगर, टीम इंडियाच्या डोक्यावर पुन्हा पराभवाची टांगती तलवार?  title=
(Photo Credit : Social Media)

IND VS AUS 3rd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात सध्या 5 सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळवली जात आहे. शनिवार 14 डिसेंबर पासून गाबा येथे सुरु झालेल्या तिसऱ्या सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे खराब झाला. परिणामी केवळ 13 ओव्हर्सचा खेळ होऊ शकला. परंतु दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी मैदानात जोरदार फटकेबाजी करून तब्बल 405 धावांचा डोंगर उभा केला. दरम्यान टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाच्या 7 विकेट्स घेण्यात यश आले. 

शनिवारी गाबा टेस्टला सुरुवात झाल्यावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले. शनिवारी पावसाच्या व्यत्ययामुळे 13 ओव्हरचाच सामना झाला. मात्र रविवारी पावसाने काहीवेळ विश्रांती घेतल्यामुळे सामना निर्विघ्न पार पडला. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी मैदानात फटकेबाजी केली. यात सर्वाधिक 152 धावा ट्रेव्हिस हेडने केल्या. यादरम्यान त्याने 18 चौकार लगावले. तर हेड पाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने देखील 101 धावा केल्या. दरम्यान त्याने 12 चौकार लगावले. 

हेड आणि स्मिथ वगळता उस्मान ख्वाजाने 21, लोबूशेनने 12, ॲलेक्स कॅरीने 45, पॅट कमिन्सने 20 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने रविवारी दिवस अखेरीस 405 धावांचा डोंगर उभा केला. टीम इंडियाच्या गोलंदाजांपैकी जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. यात त्याने उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी, ट्रेव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ, मिचेल मार्श इत्यादींना बाद केले. तर बुमराह वगळता नितेश रेड्डी आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या. 

टीम इंडियाच्या डोक्यावर पराभवाची टांगती तलवार? 

बॉर्डर गावस्कर टेस्ट सीरिजमध्ये आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यांमध्ये पर्थ येथील टेस्ट सामना हा टीम इंडियाने जिंकला. तर दुसरा सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. त्यामुळे टेस्ट सीरिज सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. दुसऱ्या टेस्ट सीरिजमध्ये पराभूत झाल्याने टीम इंडियाची WTC पॉईंट्स टेबलमध्ये घसरण झाली आणि दुसऱ्या वरून तिसऱ्या क्रमांकावर टीम इंडिया पोहोचली. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर त्यांना ऑस्ट्रेलिया विरुद्ध उर्वरित सर्व टेस्ट सामने जिंकावे लागतील. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी न केल्यामुळे टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. गाबा टेस्टमध्ये देखील ऑस्ट्रेलियाने उभारलेला धावांचा डोंगर पार करणे हे टीम इंडियासाठी आव्हानात्मक असणार आहे. 

भारताची प्लेईंग 11 :

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), रोहित शर्मा (कर्णधार), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप.

ऑस्ट्रेलियाची प्लेईंग 11 :

उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.