पैशांचा हव्यास, वडिलांच्या हत्येसाठी मुलाचे 8 दिवसांपासून प्लानिंग, यश येईना म्हणून...

Crime News In Marathi: उच्चशिक्षित इंजिनिअर मुलाने वडिलांना स्कूड्रायव्हरने भोसकून मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 17, 2024, 05:56 PM IST
 पैशांचा हव्यास, वडिलांच्या हत्येसाठी मुलाचे 8 दिवसांपासून प्लानिंग, यश येईना म्हणून...   title=
chhatrapati sambhajinagar news son killed father for money

Crime News In Marathi: संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलानेच जन्मदात्या वडिलांची हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या आठ दिवसांपासून तो वडिलांच्या हत्येचा कट रचत होता. इतकेच नव्हे तर, वडिलांच्या हत्येनंतर त्याने आई व बहिणीलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी मुलावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. श्रीकृष्ण पाटील असं मृत वडिलांचे नाव असून आरोपी मुलाचे नाव रोहित असं आहे. 

पैशाच्या लोभाने पोटच्या उच्चशिक्षित इंजिनिअर मुलाने वडिलांना स्कूड्रायव्हरने भोसकून त्यांची हत्या केली आहे.  संभाजीनगरमधील दीपनगरात भागात मंगळवारी ही घटना घडली आहे. आरोपी मुलाने आई आणि बहिणीलाही गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला. शेअर बाजारात झालेले 30 लाख रुपयांचे नुकसान भरून काढण्यासाठी केलेली उसनवारी फेडण्यासाठी तो वडिलांकडे पैशाची मागणी करीत होता, त्या वादानंतर हा प्रकार घडला.

मृत पाटील ४ वर्षांपूर्वी महावितरणमधून निवृत्त झाले होते. त्यांच्याकडे इंजिनिअर मुलाने ३० लाख रुपयांसाठी तगादा लावला होता. मात्र, आतापर्यंत तुला भरपूर पैसे दिले, बहिणीच्या लग्नासाठी पैसे ठेवले असल्याचे सांगत वडील नकार देत होते. सोमवारी रात्रीही यावरून दोघांमध्ये भांडण झाले. त्यातून चिडलेल्या मुलाने वडिलांची हत्या केली. 

आठ दिवसांपासून प्रयत्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठ दिवसांपासून रोहित वडिलांची हत्या करण्याचा कट रचत होता. वडिलांचा मृत्यू व्हावा यासाठी तो त्यांना झोपेच्या गोळ्या देत होत्या. तरीही त्या गोळ्यांचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. अखेर सोमवारी रात्री त्याने आइसक्रीममधून गोळ्या दिल्या. मात्र, तरीही मंगळवारी वडिलांना जिवंत पाहून अखेर त्यांनी त्यांची हत्या करण्याचे ठरवले. मंगळवारी रोहितने वडिलांच्या पोटात स्क्रु ड्रायव्हर खुपसून त्यांची हत्या केली. 

वडिलांची हत्या केल्यानंतर रोहितने आईचाही गळा दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी बहिणीला जाग आली त्यामुळं त्याचा हा डाव फसला. वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून रोहितच्या बहिणीने आरडाओरडा केला. त्यावेळी रोहितने स्वतःलाही इजा करुन दरोडेखोरांनी हल्ला केल्याचा बनाव रचला. पोलिसांनाही याबाबत सूचना देण्यात आली. मात्र, पोलिसांनी काहीच तासांत रोहितचा बनाव उघडा पाडत. त्याला अटक केली आहे. पण या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.