भाजीपाला, कांद्यापाठोपाठ 'चिकन'ही महागणार

चिकन महागण्याची शक्यता 

Updated: Nov 6, 2019, 11:42 AM IST
भाजीपाला, कांद्यापाठोपाठ 'चिकन'ही महागणार  title=

किरण ताजणे, झी २४ तास, नाशिक :  पाऊस लांबणीता फटका फक्त शेतीलाच नाही तर इतर लघुउद्योगांना देखील झाला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पोल्ट्रीत पाणी शिरलं होतं. यामुळे कोंबड्यांमध्ये रोगराई पसरली आहे. त्यामुळे आता कांदा, भाजीपाला, टोमॅटो पाठोपाठ चिकन देखील महागणार आहे. शिवाय कोंबड्यांच खाद्य देखील महागलं आहे.

राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच खूप मोठं नुकसान झालं आहे. आता हळू हळू त्याचा फटका शेतीपूरक व्यवसायांनाही बसू लागला आहे. परतीच्या पावसाचा मोठा फटका हा शेतमालावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. भातशेतीसोबतच कांद्याच्या पिकाचंही यामुळे मोठं नुकसान झालं आहे.

सततचा अवकाळी पाऊस अनेक ठिकाणी पोल्ट्रीत पाणी शिरलं.  त्यामुळे  कोंबड्यांवर रोगराई आली असून पोल्ट्रीत व्यवसायीकांच नुकसान होत आहे. शिवाय ज्वारी, बाजरीचं नुकसान झाल्यानं कोंबड्यांचं खाद्यही महागलं आहे. याचा फटका सामान्यांना पडणार असून किचनचं बजेट कोलमडणार आहे. 

पाऊस लांबल्यानं त्याचा परिणाम कोकणातल्या भातशेतीवर झालाच आहे. मात्र आता आंबा पीकावर देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाऊस लांबल्यानं आंबा पीक लांबण्याची शक्यता आहे. जवळपास दोन महीने आंबा पीक लांबण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये झाडांना मोहर येतो. मात्र अद्याप अनेक झाडांवर पालवी दिसते. तर काही झाडांना पालवी देखील आलेली नाही. पावसाची स्थिरता अशीच राहिली.तर त्याचा फटका आंबा बागायतदारांना बसणार आहे.