सफाई कामगारांच्या वसाहतींबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला मोठा निर्णय

कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी योजना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सफाई कामगारांच्या वसाहतीच्या भेटीतून मुख्यमंत्र्यांची महात्मा गांधी यांना स्वच्छांजली वाहिली. 

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Oct 2, 2023, 11:25 PM IST
सफाई कामगारांच्या वसाहतींबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला मोठा निर्णय title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : 'मुंबई शहर स्वच्छ करणारे, ते सुंदर करणारे आणि मुंबईकरांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा कायापालट करण्यात येईल. या वसाहतीतील सुविधांचा तत्काळ स्वतंत्र टिमद्वारे आढावा घेण्यात यावा, असे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबईकर नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ऊन-वारा-पावसात राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतीला भेट देत, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महात्मा गांधी यांना जयंतीदिनी आगळी स्वच्छांजली अर्पण केली. मुख्यमंत्र्यांनी आस्थेवाईकपणे सफाई कामगार, त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केल्यामुळे या बांधवानींही मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले.  अलीकडच्या काळात या वसाहतीला आवर्जून भेट देऊन, येथील अडीअडचणी समजावून घेणारे, मुख्यमंत्री शिंदे पहिलेच मुख्यमंत्री असल्याचीही प्रतिक्रियाही काहींनी व्यक्त केली.

स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” या राज्यस्तरीय मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील विविध प्रभागात भेट देऊन स्वच्छता अभियानाची पाहणी केली. यात प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता कामगार वसाहतीची पाहणी केली.  त्यांनी कासार वाडी कोहिनुर मॉलचा परिसर, तसेच गौतम नगर  हिंदमाता थिएटर येथे भेट देऊन स्वच्छता अभियानाचा आढावा घेतला. यावेळी आमदार सदा सरवणकर, मुंबई महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय. एस. चहल आदी उपस्थित होते. पाहणी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. 

मुख्यमंत्री म्हणाले की, या वसाहतीतील गैरसोयींची पाहणी केली. येथे आवश्यक असणाऱ्या सुविधांबाबत मुंबई महापालिकेने स्वतंत्र टिमद्वारे आढावा घ्यावा असे निर्देश दिले आहेत. या परिसरातील दोन इमारतींचे काम रखडले आहे. ते पुर्ण व्हावे याकरिता तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. दोन पाळयां मध्ये काम सुरू करावे. या परिसरातील मुख्य रस्ता, अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण व्हावीत. येथील शौचालये, स्वच्छतागृहांची स्थिती सुधारली पाहिजे यासाठी सूचना केल्या आहेत. या ठिकाणी सर्व सोयींनी युक्त अशी अभ्यासिका व्हावी. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात यावा अशा सूचना दिल्या आहेत. या कामगार बांधवांच्या उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी एक योजना तयार करावी अशा सूचना महापालिकेल्या दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

यावेळी मुख्यमंत्र्यांनी या उपस्थित कामगरांशीही संवाद साधला.' आपण सर्व मुंबई शहराच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी कष्ट करता आणि आपल्यालाच गैरसोयींना तोंड द्यावे लागते. हे चित्र बदलण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” या राज्यस्तरीय मोहिमेचा महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला गिरगाव चौपाटी येथे प्रारंभ करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी  स्वच्छता ही केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात दिसली पाहिजे. मुंबईतील सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहांची दिवसातून पाच वेळा सफाई करण्यात यावीत असे निर्देश दिले होते.  काल देखील त्यांनी कुर्ला येथील वत्सलाताई नाईक नगर एसआरए वसाहतीला भेट दिली होती. केवळ मुख्य रस्ते, चौक, समुद्र किनारे यांची स्वच्छता करण्याबरोबरच गल्ली बोळातील रस्त्यांची, झोपडपट्टी तेथील परिसर, शौचालये, गटारे यांची साफसफाई करण्याच्या सूचना केली होती.