रत्नागिरी : मी स्वप्न दाखवत नाही, ती पूर्ण करतो. आकडा सांगण्यापेक्षा कृतीला महत्व देणारे आपले महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे आपणास जी विकास कामे करायची आहेत, त्या कामांबाबत आराखडे सादर करा. निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणपतीपुळे येथे दिली. यावेळी त्यांनी भाजपला जोरदार चिमटा काढला. मी स्वप्न दाखवणारा नाही. तर ती स्वप्न पूर्ण करणारा आहे. गणपतीपुळे येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज गणपतीपुळे येथील १०२ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन झाले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आणि इतर मान्यवर उपस्थित होते. pic.twitter.com/ty81qHQMoa
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 17, 2020
कोकणबद्दल वेगवेगळी स्वप्न दाखविली गेली, मी स्वप्न दाखविली नाहीत. मी तुमची स्वप्न पूर्ण करायला आलोय. तुम्हाला जे पाहिजे ते मी करून देईन. जेवढा निधी लागेल तेवढा देईन. मी आकडा कधी लावलेला नाही, आकडा कधी खेळलेलो नाही आणि आकडा कधी बोललेलो नाही, हे आकडेबाज सरकार आपले नाही, असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला. यावेळी ते म्हणाले, आपण जे करतो ते मनापासून, हृदयापासून करतो, जे जे इथं गरजेचं आहे ते मी करणार, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
गणपतीपुळेच नव्हे तर कोकणसह नवा महाराष्ट्र घडवायचे काम आपण सर्व जण मिळून करु, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले. गणपतीपुळे येथील १०२ कोटींच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. श्री क्षेत्र गणपतीपुळे गावातील व परिसरातील रस्त्यांच्या कामांचा समावेश असलेला, हा आराखडा ३१ मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
कोकणात नाणारचा मुद्दा गाजत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणपतीपुळे येथे जाहीर सभा घेतली. मात्र या सभेत नाणारबाबत उद्धव ठाकरे यांनी एका शब्दाचा देखील उल्लेख केला नाही, तसेच नाणारमधून काही विरोधक देखील उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आले होते, मात्र त्यांची भेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झाली नाही. या निवेदनात जे स्थानिक शिवसेना पदाधिकारी या प्रकल्पाच समर्थन करत आहेत त्यांची पक्षातून हकालपट्टी करा. अशी मागणी यावेळी नाणारमधून आलेल्या विरोधकांनी केला आहे.