"वर्षावर गेलो तेव्हा पाटीभर लिंबू होते"; मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरे यांना जशास तसे उत्तर

CM Eknath Shinde :  मोहन भागवतांनी कार्यालयाचा कोपरान् कोपरा तपासून बघावा, कुठे लिंब टाकलेत का तेही बघून घ्यावे. आरएसएसच्या कार्यालयातही ते ताबा घेण्यासाठीच गेले असतील, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती

Updated: Dec 30, 2022, 04:52 PM IST
"वर्षावर गेलो तेव्हा पाटीभर लिंबू होते"; मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरे यांना जशास तसे उत्तर title=

Maharashtra Politics : राज्याच्या हिवाळी अधिवेशानाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मंत्रीमंडळासह नागपूरात आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांसह गुरुवारी नागपूरमधील महत्त्वाच्या ठिकाणांना भेट दिली. नागपूरमधील दीक्षाभूमीला येथे भेट दिली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलशाला अभिवादन केलं आणि गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला (RSS headquarters) देखील भेट दिली. यावरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याभेटीवरुन जोरदार टीका केली होती.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरएसएस कार्यालयातून बाहेर पडले असावेत. पण मोहन भागवतांना मी विचारतोय की कार्यालयाचा कोपरान् कोपरा तपासून बघा. कुठे लिंब टाकलेत का तेही बघून घ्या.कदाचित आज आरएसएसच्या कार्यालयातही ते ताबा घेण्यासाठीच गेले असतील," अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.

त्यावर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "माणूस चुकतो तेव्हा तो सुधारतो आणि त्यावेळी पुन्हा तो चुकत नाही. पण काही लोक चुकले तरी आम्ही बरोबर असे म्हणतात. एक जण चुकू शकतो, पाच जण चुकू शकतात पण 50 चुकीचे आणि मी बरोबर हे असं कसे होऊ शकतो," अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

लिंबू टिंबूची भाषा करणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली

"नागपूरातील श्रद्धास्थळांना आम्ही काल भेट दिली. त्याबाबत काही नेत्यांनी काय म्हटले हे सगळ्यांनी ऐकले. त्यातही राजकारण करण्याची संधी सोडली नाही. ज्या प्रबोधकारांनी कर्मकांडावर सातत्याने प्रहार केले आणि त्याचेच वारस म्हणवणारे लिंबू फिरवण्याची भाषा करु लागले. आम्ही वर्षा बंगल्यावर फार नंतर गेलो आणि तिथे काय काय आहे बघा असे म्हटले. तेव्हा पाटीभर लिंबू सापडले. त्यामध्ये सगळं होते. लिंबू टिंबूची भाषा करणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांसोबत प्रबोधकारांच्या विचारांनाही तिलांजली दिली. तुम्ही दुसऱ्यावर टीका करताना स्वतःचे आत्मपरीक्षण करा. यात चूक कोणाची हे स्वतःला विचारा," असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.