Maharashtra Politics : हिवाळी अधिवेशानाचा दुसरा आठवडा आजपासून सुरु होत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे सध्या दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. 'वीर बाल दिवसा'निमित्त दिल्लीत (Delhi) एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचले आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील सहभागी झाले होते. मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सभागृहात बोलणार म्हणून मुख्यमंत्री दिल्लीला पळाले अशी जहरी टीका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली.
काय म्हणाले अरविंद सावंत?
"सध्या महाराष्ट्राच्या मुलभूत प्रश्नांवर चर्चा न करता व्यक्तिगत पातळीवर टीका करण्यात येत आहे. उध्दव ठाकरे सभागृहात बोलणार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला पळाले," अशी खोचक टीका अरविंद सावंत यांनी केली.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे आमदार उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरुन मुख्यमंत्र्यावर टीका केली. मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा विषय सोडून दिल्लीत जाण्याची गरज नव्हती असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. यासोबत महाराष्ट्र कर्नाटक सीमाभाग केंद्रशासित करण्याचा ठराव करण्यात यावा अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्र्यांना दिल्लीत जाण्याची गरज नव्हती - उद्धव ठाकरे
"काही जणांनी खालच्या सभागृहात आम्हीसुद्धा लाठ्या खाल्या आहेत तुम्ही काय सांगता असे सांगितले. पण जेव्हा लाठ्या खाल्ल्यात तेव्हा तुम्ही आमच्या पक्षात होतात. आता सीमापार करुन तुम्ही दुसऱ्या राज्यात गेलात. त्यामुळे तेव्हा लाठ्या खाल्ल्यात म्हणून आता गप्प बसायला हवं असा त्याचा अर्थ होत नाही. कर्नाटक, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये एकाच पक्षाचे सरकार आहे त्यामुळे हा प्रश्न सोडवला गेलेला नाही. दोन्ही मुख्यमंत्री पंतप्रधानांना आपलं नेता मानतात. पण मुख्यमंत्री दिल्लीत गेलेत. त्यांनी महाराष्ट्राचा विषय सोडून दिल्लीत जाण्याची गरज नव्हती," अशा शब्दात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती