मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'या' प्रकरणामुळे नाराज

कोरोनाबाधित रूग्णांमध्ये वाढ 

Updated: Apr 10, 2020, 09:05 AM IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'या' प्रकरणामुळे नाराज  title=

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जगभरातून कौतुक होत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संयम आणि शिस्त सांभाळत महत्वाचे निर्णय घेतले. असं असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाल्याची बातमी समोर येत आहे. लॉकडाऊनच्या काळात जिथे पाच लोकांना एकत्र येण्यासही परवानगी नाही अशावेळी वाधवान कुटुंबातील २३ जण खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाने मुख्यमंत्री नाराज झाले आहेत. 

या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी आणि ज्या विशेष प्रधानसचिवांच्या शिफारशीच्या पत्राने वाधवान कुटुंबियांनी हा प्रवास केला त्या अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे येस बँक घोटाळा प्रकरणातील वाधवान कुटुंबियांना अशी परवानगी मिळतेच कशी? असा प्रश्न तमाम महाराष्ट्राला पडला आहे. (वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी देणारे गुप्ता सक्तीच्या रजेवर)

महत्वाची बाब म्हणजे येस बँकेच्या घोटाळा प्रकरणात कपिल वाधवान आणि धीरज वाधवान वडिल आणि मुलगा या दोघांना विशेष मनी लाँडरिंग प्रकरणात फेब्रुवारी महिन्यात जामीन मंजूर केला होता. यांना आता महाबळेश्वरमध्ये अटक करण्यात आलं असून पाचगणीच्या सेंट झेव्हिअर्स शाळेत क्वारंटाइन करण्यात आलं आहे. या प्रकरणाची आता सीबीआय चौकशी देखील होणार आहे.  (DHFL घोटाळा : वाधवान कुटुंबीय पाचगणीत क्वारंटाइन) 

मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या सर्व निर्णयांच गेल्या अनेक दिवसांपासून कौतुक होत आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला यांनी मु्ख्यमंत्र्यांच कौतुक केलं. एवढंच नव्हे तर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी देखील मुख्यमंत्र्यांच कौतुक केलं होतं.(येस बँक घोटाळा : लॉकडाऊनमध्येही आरोपी वाधवान ब्रदर्स व्हीव्हीआयपी पासने महाबळेश्वरला)

राज्य सरकारकडून करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सतत फेसबुकवरुन जनतेशी संवाद साधत आहे. एका बाजूला कोरोनाचं संकट असताना अशा पद्धतीच्या घटनांनी याचं गांभीर्य कमी होत आहे.