मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधानांना पत्र

Updated: Dec 24, 2019, 05:45 PM IST
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लक्ष घालून तातडीने आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून विनंती केली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवा यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारकडे १६ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. अनेकदा पाठपुरावा करूनही हे प्रकरण केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे प्रलंबित आहे.' असं या पत्रात म्हटलं आहे.

संस्कृत, तमिळ, तेलुगू, ओडिया, कन्‍नड, मल्याळम या भाषांना अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळालेली आहे. याआधीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून ५०० पानांचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केलेला आहे.

भारतात कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारने काही निकष ठरवले आहेत. त्यानुसार, ती भाषा ही प्राचीन असावी, त्या भाषेतील साहित्य श्रेष्ठ असावे, ती भाषा दीड ते दोन हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असावी, त्यासाठी ऐतिहासिक पुरावे देखील असावेत, त्या भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे असे वेगवेगळे निकष असतात. भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर त्या भाषेच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळते.