Uddhav Thackeray : छत्रपती संभाजीनगरात शिवसेना ठाकरे गटानं भाजपला जोर का झटका देण्याची तयारी केलीय.. येत्या रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संभाजीनगरच्या दौ-यावर असतील... त्यावेळी ठाकरे गटाच्या गळाला लागलेले भाजपचे पदाधिकारी ठाकरेंच्या उपस्थितीत हाती मशाल घेणार असल्याचं समजते.
संभाजीनगरातील 6 ते 8 माजी नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. 1 जिल्हा परिषद सदस्य, 2 पंचायत समिती सदस्य, 1 तालुका अध्यक्ष, 1 युवा मोर्चा अध्यक्ष आणि 5 मंडळ अध्यक्ष यांचा यात समावेश असणार आहे. केवळ शिवसेना शिंदे गटासाठीच काम करायचं असेल तर भाजपमध्ये राहून उपयोग काय? असा सवाल भाजपचे माजी उपमहापौर राजू शिदेंनी केलाय. संभाजीनगर पश्चिममधून विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणाही त्यांनी केली.
दरम्यान, बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी भाजपने प्रवक्ते प्रमोद राठोड यांना शिंदेंच्या घरी पाठवलं. राठोड यांनी मंत्री अतुल सावे यांच्याशी त्यांचं बोलणंही करून दिलं. मात्र ही शिष्टाई यशस्वी झालेली दिसत नाही.आगामी विधानसभा निवडणुकीआधी भाजपला पडलेलं हे खिंडार भविष्यात त्रासदायक ठरणाराय..
संभाजीनगर पूर्व विधानसभेतील अतुल सावे, संभाजीनगर पश्चिम विधानसभेत संजय शिरसाट आणि फुलंब्री विधानसभेमध्ये हरिभाऊ बागडेंना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. भाजप स्थानिक संघटनेला धक्का बसणार आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं मनोबलही वाढणार आहे. लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, आता भाजपला सुरुंग लावून शिवसेनेनं वचपा काढल्याची चर्चा सुरू झालीय. भाजप याचं उट्टं कसं काढणार, ते आता पाहायचं.