विमानात झुरळ, विमान कंपनीला पडले ५० हजारांना

विमान कंपनीला झुरळ चांगलेच महागात पडले आहे.  

Updated: Jan 2, 2020, 10:55 PM IST
विमानात झुरळ, विमान कंपनीला पडले ५० हजारांना title=
संग्रहित छाया

अरुण म्हात्रे / पुणे : विमान कंपनीला झुरळ चांगलेच महागात पडले आहे. चक्क विमान कंपनीला त्यासाठी ५० हजार रुपये आता मोजावे लागणार आहेत. त्याचं झालं असं विमान प्रवासादरम्यान विमानात झुरळ आढळून आले. या विमान कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पुण्यात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी विमान कंपनीला ही चांगलीच अद्दल घडवली आहे. 

सुरभी भारद्वाज आणि स्कंद बाजपेयी हे पुण्यातील भारती विद्यापीठ लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. कॉलेजमध्ये त्यांचे सध्या खूप कौतुक होत आहे. कायद्याचे शिक्षण घेत असताना त्यांनी ग्राहक हक्काची एक अनोखी लढाई जिंकली आहे. ३१ डिसेंबर २०१८ रोजी ते इंडिगो कंपनीच्या विमानाने दिल्लीला निघाले होते. त्यावेळी त्यांना विमानात काही झुरळे आढळून आली. 
ही बाब त्यांनी विमानातील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, त्यांनी त्यांच्या तक्रारीला गांभीर्याने घेतले नाही. दिल्लीत उतरल्यानंतर दोघांनी विमान कंपनीकडे पाठपुरावा केला. कंपनीकडूनही त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे याबाबतची तक्रार दाखल केली. नऊ महिन्यानंतर म्हणजे त्यांच्या विमान प्रवासाला एक वर्ष पूर्ण व्हायच्या एक दिवस आधी या खटल्याचा निकाल लागला. 

विमानातील झुरळे किती अपायकारक ठरू शकतात तसेच याबाबत विमान कंपनीकडून दाखवण्यात आलेला हलगर्जीपणा याबाबतचे पुरावे तक्रारदार विद्यार्थ्यांनी ग्राहक मंचासमोर सादर केले. ग्राहक मंचाच्या नोटीसीलाही कंपनीने दाद दिली नाही. त्यामुळे ग्राहक मंचाने इंडिगो कंपनीला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याच प्रमाणे तक्रारदार ग्राहकांना त्यांच्या तिकिटाचे पैसे नऊ टक्के व्याजाच्या दराने परत करण्याचे आदेश दिले आहेत.

विमान कंपनीने प्रवाश्यांकडून करण्यात आलेली तक्रार गांर्भीयाने घेतलेली नाही. तसेच ग्राहक संरक्षण मंचानेही विमान कंपनीला नोटीस बजावली होती. मात्र, त्याचेही उत्तर दिले गेले नाही, अशी माहिती ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष उमेश जावळीकर आणि ग्राहक संरक्षण कायदा तज्ज्ञ अॅड संजय गायकवाड यांनी दिली.

यासंदर्भात झी मीडियाने कंपनीची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी कंपनीला मेल केला आहे. मात्र त्याची केवळ पोच प्राप्त झाली. हा विषय केवळ नुकसान भरपाईचा नाही. तर ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकाला प्राप्त झालेल्या अधिकारांच्या प्रभावी अंमलबजावणीचा आहे. तरच 'जागो ग्राहक जागो' यासारख्या मोहिमांना यश मिळत असल्याचे म्हणता येईल.