लोकसभा निवडणूक : उरलेल्या ८ जागांसाठी पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जागा वाटपाची बैठक आज मुंबईत होत आहे.

Updated: Jan 6, 2019, 04:39 PM IST
लोकसभा निवडणूक : उरलेल्या ८ जागांसाठी पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक title=

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जागा वाटपाची बैठक आज मुंबईत होत आहे. ४० जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चर्चा पूर्ण झाली आहे. उरलेल्या जागांपैकी काही जागांच्या अदलाबदलीवर चर्चेचं घोडं अडलं आहे. त्या आठ जागांवर आज चर्चा होणार आहे. पुणे लोकसभेची जागा ही सध्या काँग्रेसकडे आहे, पण राष्ट्रवादीलाही ही जागा हवी आहे. पुण्याच्या जागेवरील हट्ट राष्ट्रवादीनं सोडला असल्याच्या चर्चा आहे. मात्र पुण्यावरील जागेचा दावा सोडला नसल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादीनं दिलं आहे.

अहमदनगरची जागा ही काँग्रेसला हवी आहे. या जागेवरून निवडणूक लढण्यासाठी राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजय विखे-पाटील हे इच्छुक आहेत. काँग्रेसकडे असलेली रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागाही राष्ट्रवादी काँग्रेसला हवी आहे. तर नंदुरबारच्या जागेवरही राष्ट्रवादीनं दावा ठोकला आहे. यवतमाळ हा काँग्रेसकडे असलेला मतदार संघ राष्ट्रवादीला हवा आहे. काँग्रेसकडे असलेला औरंगाबादच्या मतदारसंघासाठीही राष्ट्रवादी इच्छुक आहे.

एकीकडे राष्ट्रवादीनं या जागांची मागणी केलेली असतानाच रावेर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार संघ काँग्रेसला हवा आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी देशपातळीवर महाआघाडी उभारण्याचे विरोधकांचे प्रयत्न आहेत. त्यासाठी प्रत्येक राज्यात भाजपाविरोधी पक्ष एकत्र येत आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाआघाडीचे प्रमुख घटकपक्ष आहेत. त्याचबरोबर इतर लहान पक्षही या महाआघाडीत सहभागी होत आहेत. मात्र, अनेक बैठकानंतरही राज्यातील या महाआघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

मित्र पक्षांच्या जागा वगळता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही जागांचे वाटप अद्याप शिल्लक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ४० जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चर्चा पूर्ण झाली आहे.

मित्रपक्षांना काय मिळणार?

- राजू शेट्टी यांच्यासाठी हातकणंगलेची जागा सोडण्यात आलीय

- तर पालघरची जागा बहुजन विकास आघाडीसाठी सोडण्याची तयारी आहे

- अकोल्याची जागा भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी ठेवण्याची आघाडीची तयारी आहे. पण भारिप बहुजन महासंघानं आधीच एमआयएमसोबत युती केली आहे. त्यामुळे ही जागा प्रकाश आंबेडकर यांना सोडण्यात आली तर एमआयएमचं काय होणार हा प्रश्नही आहे.

- तर अमरावतीची जागा राजेंद्र गवई यांच्यासाठी सोडली जाऊ शकते.

राज बब्बर, अजहरुद्दीन मुंबईतून निवडणूक लढवण्यास इच्छुक