मुंबई : बॉ़म्बस्फोट आणि हत्या प्रकरणात पुन्हा एकदा सांगली कनेक्शन उघड झालंय. तीन वेगवेगळ्या घटनांचं कनेक्शन मांत्र सांगलीच असल्याचं समोर आलंय.
'सनातन' संस्थेशी संबंधीत असलेला, मलगोंडा पाटीलचा गोवा इथं बॉम्ब स्फोटात मृत्यू झाला होता. तो सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातला कारजनगी गावातील होता. मडगाव स्फोटातील संशयित आरोपी रुद्रगोंडा पाटील हा मृत मलगोंडा पाटीलचा चुलत भाऊ आहे. मडगाव स्फोटांवेळी संशयित मलगोंडा पाटील हा ठार झाला होता. बॉम्ब प्लान्ट करत असताना स्फोट झाला असल्याचा संशय आहे. तेव्हापासून रुद्रगोंडा पाटील फरार असून एनआयए, एसआयटी आणि सांगली पोलीस त्याच्या मागावर आहेत.
सांगली जिल्ह्यातील ढालगावचा प्रवीण लिमकर हा सुद्धा मडगाव स्फोटांतील संशयित फरार आहे.
सनातनचा साधक समीर गायकवाडला कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केली होती. समीर सांगलीच्या मोती चौकात राहत होता. इथं त्याने काहीकाळ मोबाइल दुरुस्तीचे दुकान चालवले होते. समीर गायकवाड हा वादग्रस्त सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता असल्याचं एसआयटी प्रमुख - पोलीस महानिरीक्षक संजीव कुमार यांनी स्पष्ट केलं होतं. गायकवाडला सप्टेंबर २०१६ मध्ये अटक करण्यात आली होती. ३२ वर्षांचा समीर विष्णू गायकवाड हा सांगलीच्या शंभर फुटी रोडवरील मोती चौक परिसरात राहत होता. गायकवाड १९९८ पासून सनातन संस्थेत पूर्णवेळ काम करतो. मोबाईल रिपेअरिंगचं काम करणारा समीर गायकवाड हा मुंबईत सनातन संस्थेचा 'धर्मरथ' चालवायचं काम करत होता.
आता वसई इथून बॉम्ब तयार करण्याप्रकरणी सुधन्वा गोंधळेकर याला अटक करण्यात आलीय. गोंधळेकर हा मुळचा साताऱ्यातल्या करंज पेठचा... अवैध शस्त्रसाठ्याप्रकरणी एटीएसनं अटक केलेला गोंधळेकर जरी सातारा येथील असला तरी, तो सांगली इथल्या संभाजी भिडेंच्या 'शिवप्रतिष्ठान' संघटनेशी संबंधित आहे... मात्र, 'तो चार वर्षांपूर्वी शिवप्रतिष्ठानच्या उपक्रमात सहभागी व्हायचा... मात्र, त्याच्याकडं कुठलंही पद नव्हतं' असं शिवप्रतिष्ठानकडून सांगण्यात येतंय.
शुक्रवारी, नालासोपाऱ्यातल्या वैभव राऊतपाठोपाठ एटीएसनं आणखी दोघांना अटक केलीय. शरद कळसकरला नालासोपाऱ्यातून तर सुधन्वाला पुण्यातून अटक झाली. 'सनातन' प्रकरणात अटक झालेला कळसकर मूळचा औरंगाबादचा.... गेली चार वर्ष कोल्हापूरला असल्याचं त्यानं घरी सांगितलं होतं. लेथ मशीनच्या फिटरचं काम करत असल्याचंही तो म्हणाला होता. गेल्या उन्हाळ्यात तो घरी सुद्धा येऊन गेलेला. त्याचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत.
दरम्यान, सुधन्वा, शरद आणि वैभवला १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिलीय. एका सिमकार्डमुळे या शस्त्रसाठ्याचा पर्दाफाश झालाय. शरदच्या घरातून बॉम्ब बनवण्याची कागदपत्रंही जप्त केलीयत. सणासुदीला घातपाताचा कट होता अशी माहिती सूत्रांनी दिलीय. दरम्यान एटीएसचा तपास योग्य दिशेने सुरूय. आणखी तपासाअंती तथ्य समोर येईल असं गृहराज्यमंत्री केसरकरांनी सांगितलंय.
पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी गोळी घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातही 'सनातन' या संस्थेचं नाव समोर आलं होतं. याप्रकरणात जून २०१६ मध्ये अटक करण्यात आलेला वीरेंद्र सिंग तावडे हा 'हिंदू जनजागृती समिती'शी संबंधित होता. 'हिंदू जनजागृती समिती' ही सनातनचीच एक शाखा आहे. तसंच कन्नड विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि हिंदू धर्मातील अंधश्रद्धेवर परखड मतं मांडणारे एम एम कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातही 'सनातन' कनेक्शन समोर आलं होतं.