eknath shinde : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा घातपात घडवण्याचा कट; एकनाथ शिंदे यांनी दिले चौकशीचे आदेश

घातपात घडवण्याचा कट...माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा (Ashok Chavhan) गंभीर आरोप... माझा मेटे करण्याचा प्रयत्न होत असल्याची नांदेड पोलिसांकडे तक्रार, मुख्यमंत्र्यांकडून तक्रारीची दखल. 

Updated: Feb 20, 2023, 10:11 PM IST
eknath shinde : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा घातपात घडवण्याचा कट; एकनाथ शिंदे यांनी दिले चौकशीचे आदेश title=

Eknath Shinde on Former Chief Minister Ashok Chavan :  माझा घातपात घडवण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप  माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Former Chief Minister Ashok Chavan) यांनी केला आहे. माझा मेटे करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रारच चव्हाण यांनी नांदेड पोलिसांकडे केली आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) यांनी गंभीर दखल घेतली आहे. तसेच या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. 

आपला विनायक मेटे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलाय. आपल्या घातपातचा कट रचला जात असून भाडोत्री लोकांकडून आपल्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यासंदर्भात त्यांनी नांदेड पोलिसांत तक्रार दिली असून आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अशोक चव्हाणांनी केली आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण?

मी सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळातील काही शासकीय पत्रे मिळवून अज्ञात व्यक्तींनी त्यातील सही कायम ठेवून व मूळ मजकूर मिटवून बनावट कोरे लेटरहेड तयार केले आहे. या बाबीची कुणकुण मला अगोदरच लागली होती. फक्त स्वाक्षरी असलेले एक कोरे लेटरहेडही मला मिळाले होते असा आरोप चव्हाण यांनी केला आहे.  त्यामुळे मी यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानुसार त्या प्रकरणाची 31 जानेवारीपासून पोलीस चौकशीही सुरू झाली आहे असे चव्हाण यांनी सांगितले.

पुन्हा एकदा अशाच बनावट कोऱ्या लेटरहेडवर मराठा आरक्षणासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले एक खोटे पत्र मिळाल्याने मी तातडीने नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची भेट घेऊन याबाबत लेखी तक्रार दाखल केली असल्याचे देखील चव्हाण म्हणाले .

ज्याअर्थी माझ्या सहीचे बनावट पत्र तयार करण्यात आले, त्याअर्थी पुढील काळात खोटे दस्तऐवज तयार करून त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. आगामी काळात अनेक निवडणुका असून, राजकीय दृष्ट्या प्रतिमाहनन व जनतेत गैरसमज निर्माण करण्यासाठी हे बनावट दस्तऐवज तयार केले असावेत, असा माझा संशय आहे. बनावट पत्रे तयार करून विविध समाजात शंका-कुशंका निर्माण करून सामाजिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचाही प्रयत्न असू शकतो. सदर बाबीचे गांभीर्य व त्याचे संभाव्य परिणाम लक्षात घेता या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी माझी मागणी आहे.

त्याचप्रमाणे मुंबई आणि नांदेडमध्ये माझ्यावर खासगी वा भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जाते आहे. सदरहू व्यक्ती पाठलाग करून माझ्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करीत असल्याचे दिसून येते. यावरून माझा घातपात घडवण्याचे त्यांचे कारस्थान असावे, अशीही शक्यता असल्याची भिती चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

अशोक चव्हाण यांच्या धमकी फोन प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.  मुख्यमंत्र्यांनी चव्हाण यांना फोन करुन माहिती घेतली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरण माहिती घेत चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले.