मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चाललेला आहे. आज राज्यात ५३१८ कोरोनाबाधित नवे रूग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणे ४४३० रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ८४,२४५ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.९४% एवढे झाले आहे.
राज्यात आज १६७ कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ८६ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८१ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.५७% एवढा आहे.
राज्यात आज ६७,६०० ऍक्टिव्ह रूग्ण आहेत. मुंबईत १४०२ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. आतापर्यंत हा आकडा ७४२५२ एकूण कोरोना रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४१ कोरोनाबाधितांचा मृत्यू आज झाला आहे. असे एकूण ४२८४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
'कोरोना कोविड १९' या संसर्गजन्य आजारास प्रतिबंध करण्यासाठी बृहन्मुंबई महापलिकेद्वारे सातत्याने व सुनियजित पद्धतीने अव्याहत प्रयत्न करण्यात येत असून या प्रयत्नांना यश येत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. या उदाहरणांमध्ये आणखी एका उदाहरणाची नुकतीच भर पडली आहे. यानुसार बृहन्मुंबई महापालिकेच्या ‘एच पूर्व’ व ‘एफ उत्तर’ या दोन प्रशासकीय विभागांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने नुकताच १०८ दिवसांचा टप्पा गाठत शतकपूर्ती केली आहे.
विशेष म्हणजे उपलब्ध माहितीनुसार महापालिका क्षेत्रांचा विचार केल्यास रुग्ण दुपटीचा कालावधी १०० दिवसांपेक्षा अधिक असणारे हे देशातील हे बहुदा एकमेव उदाहरण असावे. कोविड प्रतिबंधासाठी महापलिकेने सातत्याने राबविलेल्या सर्वस्तरीय उपाययोजना आणि त्या उपाययोजनांना मिळालेली नागरिकांची अत्यंत मोलाची परिणामकारक साथ यामुळेच हे शक्य झाले आहे.