कोरोनाच्या दहशतीमुळे रेल्वे थांबली; प्रवासी मात्र ताटकळत

प्रवाशांना आता घराची प्रतीक्षा  

Updated: Mar 23, 2020, 03:55 PM IST
कोरोनाच्या दहशतीमुळे रेल्वे थांबली; प्रवासी मात्र ताटकळत  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : Corona कोरोनाच्या विळख्यात सारा देश सापडला आहे. याच धर्तीवर केंद्र शासनाने वेळीच निर्णय घेत रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी अचानक रेल्वेची चाकं पूर्णपणे थांबली. पण, प्रवासासाठी निघालेले प्रवासी मात्र ताटकळतच राहिले. पुणे, वर्धा अशा अनेक स्थानकांवर प्रवाशांची गैरसोय झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

वर्ध्यात आले ते स्थानकावर अडकले आहेत. त्यांनी रेल्वे स्थानकाबाहेर निवारा शोधत रात्र काढली खरी पण, आता पुढे काय असा प्रश्न या प्रवाशांसमोर निर्माण झाला आहे. रेल्वे गाडी रद्द झाली म्हणून दोन दिवसांपासून वर्धा स्थानकाच्या बाहेर काही प्रवासी ताटकळत बसलेत, कुठलीतरी नवीन गाडी लागेल, काही पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईल या आशेवर तीन दिवस निघाले खरे पण अचानक रेल्वे सेवाच बंद झाली.

जवळपास तीन रात्री रेल्वे स्थानकाबाहेर काढणाऱ्या राजस्थानच्या काही प्रवाश्यांना तर आता घराची ओढ लागली आहे. रविवारच्या कर्फ्युची रात्र खायला देखील देणारी नव्हती अशात करणार तरी काय असाच प्रश्न प्रवाशांसमोर उभा राहिला. 

पुण्यातही काहीशी अशीच परिस्थिती... 

https://zeenews.india.com/marathi/video/pune-railway-and-st-bus-service-...

एकिकडे हे चित्र असतानाच अखेर या ताटकळणाऱ्या प्रवशांना जेवणाची सोय व्हावी म्हणून काही सामाजिक कार्य करणाऱ्या तरुणांनी पुढाकार घेतला, मात्र दोन दिवसांपासून हे प्रवासी उपाशी असल्याचे सांगत आहेत. सध्या शहरातील  सामाजिक संघटना धावून येऊन त्यांना एक वेळेचे जेवण म्हणून पोहे देण्यात आले आहेत, पण कोरोचाशी लढा देत असताना या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. या साऱ्यामध्ये आता संयम आणि स्वयंशिस्तच प्रसंगातून तारणार आहे हे खरं.