कल्याण डोंबिवलीत इमारतीतले रुग्ण वाढले; केडीएमसीच्या सर्वेक्षणात माहिती समोर

एकूण रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण इमारतींमधले, झोपडपट्टी आणि चाळीत रुग्णांची संख्या कमी

Updated: Sep 10, 2020, 11:22 PM IST
कल्याण डोंबिवलीत इमारतीतले रुग्ण वाढले; केडीएमसीच्या सर्वेक्षणात माहिती समोर title=
संग्रहित फोटो

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत गेल्या काही दिवसात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मात्र या नव्या रुग्णांमध्ये इमारतीत राहणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता ही एक नवीन चिंतेची बाब ठरत आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत मध्यंतरीच्या काळात कोरोना रुग्णांचा आकडा स्थिर असताना, गणेशोत्सवानंतर मात्र रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सध्या एकूण रूग्णसंख्या 33, 500 हजारांच्या घरात पोहोचली आहे. या नव्या रुग्णांमध्ये इमारतीत राहणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 80 टक्के असल्याची धक्कादायक बाब केडीएमसीने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. 

केवळ गणेशोत्सवाच्या काळात कल्याण डोंबिवलीत तब्बल 4 हजार 500  नवे रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये चाळ आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण कमी असून, इमारतीतले लोक नियम पाळत नसल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा निष्कर्ष केडीएमसीनं काढला आहे. यामुळे आता इमारती, रहिवासी संकुलं यांनी जास्त काळजी घेण्याची आणि एखादा रुग्ण आढळल्यास तातडीने सर्वांच्या चाचण्या करुन घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

दरम्यान, कल्याण-डोंबिवली मनपात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 37073 इतकी झाली असून आतापर्यंत 708 जणांचा मृत्यू झाला आहे.