अमर काणे / नागपूर : शहरातील १६ रुग्णालयांना नागपूर महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार होत असलेल्या १६ रुग्णालयांनी शासनाने निर्देशित केलेल्या दरापेक्षा अधिक दर लावून बिलाची आकारणी केली होती. त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. या रुग्णालयांनी आकारलेली जादा रक्कम रुग्णास परत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कोव्हिड रुग्णांवर उपचार करताना खासगी कोव्हिड हॉस्पिटलसाठी शासनाने दरसूची जारी केली आहे. त्यानुसार रुग्णांकडून बिलाची आकारणी होणे अपेक्षित आहे.यासाठी प्रत्येक हॉस्पीटलसाठी पूर्व अंकेक्षक नेमण्यात आले आहे. या अंकेक्षकांकडून बिलाचे अंकेक्षण करण्यात येते. दरम्यान, या सर्व हॉस्पीटलच्या बिलाचे अंकेक्षण केले असता शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दराने आकारणी केल्याची बाब उघडकीस आली.
काही रुग्णालयांनी पी.पी.ई.किट चे दर शासन दरापेक्षा अधीक लावला आहे तसेच काही रुग्णालयांनी बेड चे दर फिजीशीयन व्हीजीट दर अधीक लावले, असे निर्दशनास आले आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी याची गंभीर दखल घेतली तातडीने या हॉस्पीटल्सना नोटीस बजावली. तसेच रुग्णांकडून अतिरिक्त वसूल केलेली रक्कम तातडीने रुग्णांना परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेया कार्यवाहीमुळे खासगी हॉस्पीटल्सना दणका बसला असून रुग्णांना मात्र दिलासा मिळाला आहे.
नोटीस बजावण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये न्यूक्लिअस मदर ॲण्ड चाईल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल छत्रपती चौक, ओरियस इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस, ग्रेस ऑर्थो हॉस्पीटल रविनगर, मेडिकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, कोराडी रोड, सेनगुप्ता हॉस्पीटल रविनगर, सुश्रुत इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस, रामदासपेठ, सेंट्रल हॉस्पीटल रामदासपेठ, गंगा केअर हॉस्पीटल रामदासपेठ, समर्पण हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च इंस्टिट्यूट रामदासपेठ, सिम्स हॉस्पीटल बजाजनगर, एव्हर शाईन हॉस्पीटल, श्री भवानी मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च इंस्टिट्यूट ट्रस्ट पारडी, सेव्हन स्टार हॉस्पीटल ग्रेट नाग रोड, सनफ्लॉवर हॉस्पीटल, विवेका हॉस्पीटल, झेनिथ हॉस्पीटल यांचा समावेश आहे.