राज्याच्या या शहरात उद्यापासून १५ दिवस 'पुन:श्च लॉकडाऊन'

कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता निर्णय

Updated: Jun 17, 2020, 09:56 PM IST
राज्याच्या या शहरात उद्यापासून १५ दिवस 'पुन:श्च लॉकडाऊन' title=
प्रातिनिधीक छायाचित्र

भिवंडी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन:श्च हरी ओम म्हणत राज्यातल्या कोरोना लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर रस्त्यावर पहिल्याच दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी अशीच गर्दी झाली तर पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा दिला. यानंतर आता भिवंडीमध्ये उद्यापासून पुन्हा एकदा लॉकडाऊन सुरू होणार आहे. भिवंडी शहरामध्ये पुढचे १५ दिवस लॉकडाऊन असेल.

भिवंडी शहरामध्ये १८ जूनपासून ३ जुलैपर्यंत लॉकडाऊन पाळण्यात येईल, असं महापालिका आयुक्त प्रवीण अष्टीकर यांनी सांगितलं. भिवंडीमधील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर प्रतिभा पाटील यांनी पुन्हा लॉकडाऊन सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. महापौरांच्या या प्रस्तावाला सगळ्यांनी पाठिंबा दिल्यानंतर आयुक्तांनीही याला परवानगी दिली. 

लॉकडाऊनच्या काळात भिवंडीमध्ये दूध, मेडिकल आणि किराणा मालाची दुकानं ठराविक वेळेत सुरू राहतील. भिवंडीत मंगळवारपर्यंत ६५० कोरोनाग्रस्त सापडले आहेत, तर ३० जणांचा मृत्यू झाला. 

दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात एका दिवसात ४५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ७०५ नवे रुग्ण आढळले आहेत. फक्त भिवंडी शहरात कोरोनामुळे एका दिवसात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यात आत्तापर्यंत १७,८२३ रुग्णांची नोंद झाली आहे, तर ५९५ जणांना जीव गमवावा लागला आहे.