'ते फिरत नाहीत, माझ्या फिरण्याचा त्यांना त्रास', फडणवीसांची टीका

कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

Updated: Jul 9, 2020, 08:06 PM IST
'ते फिरत नाहीत, माझ्या फिरण्याचा त्यांना त्रास', फडणवीसांची टीका

औरंगाबाद : कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोना संकटात आम्ही राज्यात फिरतोय, समस्या समजावून घेऊन त्या सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी राज्यात समांतर सरकार चालवतो, हा आरोप चुकीचा आहे. ते फिरत नाहीत आणि मी फिरतोय तर यांना त्रास होतोय, पण आम्ही फिरत राहणार, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. राजकारण बंद करून कधीतरी कोरोनाबाबतही अग्रलेख लिहा, असा टोला फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. 

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करणं गरजेचं आहे. रुग्ण संख्या वाढली तरी रुग्णांची सोय करायची तयारी ठेवावी. मेडिकल कॉलेजमध्ये स्टाफ अपुरा आहे. औषधं उपलब्ध नाहीत, अशी तक्रार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ फक्त क्रिटिकल रुग्णांनाच मिळतोय. इतर रुग्णांना मिळत नाही. खासगी हॉस्पिटल अजूनही लूट करतयात, याबाबत लक्ष घालण्याची गरज असल्याचं फडणवीस म्हणाले.

सारथीला मारलं जातंय

सारथीबाबत आज मोठा गोंधळ झाला. सारथीला पद्धतशीरपणे मारलं जातंय. आमच्या सरकारने जे केलंय ते संपवण्याचा घाट सुरू आहे. ८ कोटी रुपयांमध्ये काय साध्य होणार आहे? असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे.

राज्य सरकार बदलेल का याचं उत्तर तेच देऊ शकतात. आम्हाला राजकारण करायचं नाही. आम्ही कोरोनासोबत लढणार आहोत. यांचा अंतर्विरोध सातत्याने पुढे येतोय. या काळात अंतर्विरोध नसावा. अंतर्विरोध असलेलं सरकार कधीच चालत नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. 

परीक्षेचा विषय इगोचा नको

युजीसीने देशाचा विचार करून निर्णय घेतला आहे, फक्त महाराष्ट्राचा विचार केलेला नाही. परीक्षा विषय इगोचा करु नये. आपण अजून मुल्यांकन पद्धत ठरवू शकलो नाही, त्यामुळे परीक्षेचा पोरखेळ होऊ नये, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं. 

शेतकऱ्यांना बांधावर काहीही मिळत नाही. ना खत ना युरिया. सरकारकडे योजना नाही, फक्त घोषणा केल्या जात आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.