अमरावती : सरकारच्या आदेशाची प्रशासनाकडूनच पायमल्ली झालीय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलेही शासकीय कार्यक्रम घेऊ नका, असे आदेश असताना अमरावती जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचे आधीकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग आज अमरावती येथील सांस्कृतिक भवनात घेण्यात आले आहे. यात हजारो कर्मचाऱ्यांची इथे गर्दी झाली होती.
दरम्यान, अतिशय धक्कादायक आणि संतापजनक बातमी पुण्यातून. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नका, हा मुख्यमंत्र्यांचा शासकीय आदेश त्यांच्याच मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री असलेल्या छगन भुजबळांनी धुडकावल्याचे दिसून आले आहे.
मुख्यमंत्र्यांचा हा आदेश वरिष्ठ मंत्री छगन भुजबळांनीच धाब्यावर बसवलाय. कारण सरकारचे हे आदेश झुगारुन छगन भुजबळ पुण्यात एका शाळेच्या इमारतीच्या उदघाटनासाठी पोहोचले. धक्कादायक बाब म्हणजे ज्या पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक संशयित रुग्ण आढळलेत, त्या पुण्यातच भुजबळांनी मोठ्या गर्दीत या सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली.
आणखी धक्कादायक म्हणजे या कार्यक्रमासाठी शाळेतली मुलंही गोळा करुन आणण्यात आली. कोरोनाने एवढा धुमाकूळ घातलेला असतानाही भुजबळांनी हा कार्यक्रम स्वीकारलाच कसा, हा प्रश्न आहे. त्यावर भुजबळांचा खुलासाही सर्वाधिक अचंबित करणारा आहे. तर दुसरीकडे 'झी २४ तास'नं हा मुद्दा उपस्थित केल्यावर राज्याचे आरोग्य मंत्रीही भुजबळांचं लंगडं समर्थन केल्याचे दिसून आले.
मंत्रीमहोदय, तुम्ही दिलेले आदेश तुमच्या मंत्र्यांपर्यंतच पोहोचत नसेल, तर जनतेकडून काय अपेक्षा ठेवाल. राज्य एका आव्हानातून जात असताना भुजबळांसारख्या जुन्या जाणत्या मंत्र्यांनी जबाबदारीनं वागणं गरजेचं नाही का, अशा वेळी शाळेची मुलं गोळा करुन, गर्दी करुन इतका बेजबाबदारपणा मंत्रीच दाखवणार असतील, तर कसं चालेल, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.