जळगाव : मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार कामात भ्रष्टाचार

अधिकाऱ्यांना हाताशी धरून ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट कामाबाबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय वराडे यांनी शासनाकडे तक्रार केलीय. 

Updated: Dec 23, 2017, 12:27 PM IST
जळगाव : मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार कामात भ्रष्टाचार title=

विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : जलयुक्त शिवारच्या कामाचा एका दिवसात कार्यादेश, दुसऱ्या दिवशी काम आणि तिसऱ्याच दिवशी संपूर्ण कामाची रक्कम ठेकेदाराला अदा केल्याचा अजब प्रकार जळगावमधल्या ग्रामविकास जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलाय. अधिकाऱ्यांना हाताशी धरून ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट कामाबाबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय वराडे यांनी शासनाकडे तक्रार केलीय. पाहूया यासंदर्भातला हा एक रिपोर्ट..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेच्या कामात अनियमितता झाल्याचं जळगावात उघड झालं. अमळनेर तालुक्यातील रामेश्वर, निमझरी, कंडारी बुद्रुक, जवखेडा, एकतास या गावांमध्ये २०१६ साली जलयुक्त शिवार योजनेची सात कामं हाती घेण्यात आली. ठेकेदार आर. एस. पाटील कन्स्ट्रक्शनला या कामांचा ठेका देण्यात आला. त्यासाठी २९ मार्च २०१६ रोजी कामाचा कार्यादेश देण्यात आला. लगेचच ३१ मार्चला म्हणजे तिसऱ्याच दिवशी ठेकेदाराला या संपूर्ण कामाच्या मोबदल्यात ७४ लाख ५३ हजार ६७६ रुपयांचा धनादेश देण्याची किमया शासनाच्या ग्रामविकास जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. विशेष म्हणजे मार्च २०१६ मध्ये दिलेला धनादेश ठेकदार आर. एस. पाटील कन्स्ट्रक्शनने वर्षभर वटवलाच नाही. तो गहाळ झाला असं सांगून ठेकेदाराला वर्षभरानंतर म्हणजे ३१ मार्च २०१७ रोजी पुन्हा ७४ लाख ५३ हजार ६७६ रुपयांचा धनादेश कार्यकारी अभियंत्यांनी दिला. धनादेश हरविल्याची पोलिसांत कुठं तक्रार नसताना अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला नव्यानं धनादेश दिला कसा याबाबत प्रशचिन्ह निर्माण झालंय. शिवाय कामही निकृष्ठ केल्यानं या सगळ्या प्रकाराबाबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय वराडे यांनी संबंधित खात्याचे मंत्री तसंच अधिकाऱ्यांकडे  तक्रार केली आहे.
 
ज्या भागात ही जलयुक्तीची कामे झाली आहेत ती अतिशय निकृष्ट झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. तक्रारी करूनही ठेकेदाराने त्याची तमा न बाळगता कामं पुर्ण केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या सगळ्या कामाची जबाबदारी जळगावहून खास नियुक्ती करून घेतलेले शाखा अभियंता एस. एस. जोशी यांच्यावर होती.. त्यांनीही या सगळ्या प्रकाराबद्दल मोघम उत्तर देत हात वर केलेत.

अमळनेरच्या आमदारांनीही या कामाबाबत तक्रार केली होती. त्यानंतर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र तीही कार्यवाही अद्याप झालेली नाही. दुष्काळी असलेल्या अमळनेर तालुक्यातील जलयुक्तच्या कामांतच एवढ्या अनागोंदी असतील तर जिल्ह्यातील जलयुक्त शिवारच्या कामांचं पाणी कुठं कुठं मुरलंय याची चौकशी होणं आता गरजेचं आहे.