Breaking News : संजय राऊतांना 15 दिवसांचा तुरुंगवास! कोर्टाचा निकाल; सोमय्यांमुळे अडकले

Court Convicted Sanjay Raut: संजय राऊत यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर निकाल देताना कोर्टाने त्यांना दोषी ठरवत तुरुंगवास आणि दंड अशी दुहेरी शिक्षा सुनावली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 26, 2024, 12:37 PM IST
Breaking News : संजय राऊतांना 15 दिवसांचा तुरुंगवास! कोर्टाचा निकाल; सोमय्यांमुळे अडकले title=
संजय राऊत यांना कोर्टाने दोषी ठरवलं आहे (फाइल फोटो)

Court Convicted Sanjay Raut: भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊथ यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात माझगाव सेशन्स कोर्टाने निकाल दिला आहे. कोर्टाने राऊत यांना दोषी ठरवलं आहे. संजय राऊत यांनी सोमय्या दांपत्याने शौचालय निर्मितीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केलेला. हा घोटाळा 100 कोटींचा असून या पैशाचा अपव्यय केल्याचा आरोप केला होता. संजय राऊतांना 15 दिवसांच्या तुरुंगवासाबरोबरच 25 हजारांचा दंड ठोठावला आहे, अशी माहिती विवेकानंद गुप्ता यांनी 'झी 24 तास'शी बोलताना दिली आहे.

मेधा किरीट सोमय्या यांची याचिका

मानहानी प्रकरणामध्ये कोर्टाने राऊतांना दोषी ठरवलं आहे. सेशन्स कोर्टात किरीट सोमय्यांची पत्नी डॉ. मेधा किरीट सोमय्या यांनी एक याचिका दाखल करत राऊतांवर मानहानीचा दावा केला होता. संजय राऊत यांना कोर्टाने 15 दिवसांची कैद आणि 25 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 500 अंतर्गत राऊत यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हा घोटाळा काय?

मिरा भाईंदर शहरामध्ये एकूण 154 सार्वजनिक शौचालये बांधण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं. त्यातील 16 शौचालये बांधण्याचं काँट्रॅक्ट भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानला दिलं होतं. मात्र बनावट कागदपत्रे सादर करुन, मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केली. तसेच साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप, राऊत यांनी केला होता. हा सर्व घोटाळा 100 कोटींचा असल्याचाही त्यांचा दावा होता.

नक्की वाचा >> 'त्या शाळेतील मुलींचा वापर करुन पॉर्न फिल्मस...', राऊतांचं गंभीर विधान; म्हणाले, 'भाजपा...'

संजय राऊत काय म्हणाले होते?

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्या कुटुंबाच्या संस्थेच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 2022 साली एप्रिल महिन्यामध्ये केला होता. मीरा भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी काही कोटींचा शौचालय घोटाळा झाल्याचा दावा करताना राऊत यांनी, "ही मंडळी कुठे कुठे पैसे खातात पाहा. विक्रांतपासून ते शौचालयापर्यंत," असा टोला राऊत यांनी लगावला होता. "किरीट सोमय्या व त्यांचे कुटुंब युवा प्रतिष्ठान नावाची संस्था चालवत होते. त्यांनी केलेल्या या शौचालय घोटाळ्याची कागदपत्रे पाहून हसायला आले. खोटी बिले, पर्यावरणाचा ऱ्हास करुन निर्माण केलेले शौचालय, पैसे कसे काढले याची माहिती बाहेर येईल," असा दावा राऊत यांनी केला होता. "तुम्ही फक्त आता खुलासे करत बसा. खरे म्हणजे यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला हवे. त्यांना भ्रष्टाचाराविरोधात राग आहे," असंही राऊत म्हणालेले.

नक्की वाचा >> सिंघम कोण शिंदे की फडणवीस? कसं ठरवायचं राऊतांनी सांगितलं! म्हणाले, 'आधी तुमच्यात...'

मेधा सोमय्यांकडून आरोप फेटाळत कोर्टात धावा

मात्र संजय राऊत यांनी आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर लावलेले हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगत मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा केला होता. याच प्रकरणात आता राऊतांविरोधात निकाल लागला आहे. आता राऊत या निकालाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देणार का हे पहावं लागणार आहे. "मी कोर्टाच्या निकालावर समाधानी आहे," अशी पहिली प्रतिक्रिया या निकालानंतर मेधा सोमय्या यांनी नोंदवली आहे.