Corona outbreak : संपूर्ण राज्यासाठी एकच निर्णय होईल - अजित पवार

राज्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे.  पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटाला (Corona outbreak) तोंड द्यावे लागत आहे.  

Updated: Apr 10, 2021, 03:33 PM IST
Corona outbreak : संपूर्ण राज्यासाठी एकच निर्णय होईल - अजित पवार

पुणे : राज्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे.  पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटाला (Corona outbreak) तोंड द्यावे लागत आहे. परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक होत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून महाविकास आघाडी सरकारने वीकेंड लॉकडाऊन (Lockdown) लागू केला आहे.  आता महाविकास आघाडी सरकार आणखी एक पुढचे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रासाठी (Maharashtra) एकच निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. 

Weekend Lockdown : राज्यात चांगला प्रतिसाद

राज्यातील लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकी बोलावली आहे. या बैठकीत संपूर्ण  राज्यासाठी एकच निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेऊन चालणार नाही, असे देखील त्यांनी बोलून दाखवले आहे.

याचबरोबर उद्यापासून दुकाने उघडण्याच्या व्यापाऱ्यांच्या भूमिकेबद्दलही आज किंवा उद्या निर्णय होईल, अशी देखील माहिती यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आज सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षांचे नेते विरोधी पक्षनेते आणि महाविकासआघाडीमधील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत 10 वी आणि 12वीची परीक्षा तसेच निर्बंध शिथिल करायचे की अधिक कठोर करायचे यावर विचारविनिमय होणार आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने निर्बंघ अधिक कडक करण्याचा सल्ला कृती दल आणि अन्य तज्ज्ञांनी राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या विधानाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे राज्यात एखाद्या आठवड्याचा संपूर्ण लॉकडाऊन लागू शकतो, अशी चर्चा आहे.