Pune Crime : कोयता गँगला पकडा, बक्षीस मिळवा... पुणे पोलिसांकडून बक्षिसांची खैरात

गेल्या काही महिन्यांपासून पुण्याला कोयता गँगचं ग्रहण लागलंय. हातात कोयते घेऊन दुकानांची, गाड्यांची तोडफोड करायची, आता तर भरदिवसाही ही गँकग दहशत माजवू लागली आहे

Updated: Feb 1, 2023, 10:38 PM IST
Pune Crime : कोयता गँगला पकडा, बक्षीस मिळवा... पुणे पोलिसांकडून बक्षिसांची खैरात  title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune) कोयता गँगने (Koyta Gang) दहशत पसरवली आहे. गेल्या काही दिवसात पुण्यातल्या विविध भागात कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. त्यातच काल येरवड्याच्या (Yerwada) बालसुधारगृहातून सोमवारी मध्यरात्री कोयता टोळीतील 7 सदस्य सुधारगृहातून पळून गेले. या सातही जणांना वेगवेगळ्या गुन्हा प्रकरणात बालसुधारगृहात ठेवण्यात आलं होतं. इतकंच नाही तर कोयता संस्कृती शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये पसरली आहे. आपल्या मैत्रिणीशी बोलतो म्हणून 17 वर्षांच्या विद्यार्थ्याने आपल्या सहकारी विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केला. यात विद्यार्थी जबर जखमी झाला. 

पोलिसांनी कंबर कसली
पुणे शहर आणि परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी आता पुणे पोलिसांनी (Pune Police) कंबर कसलीय. या गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी आता बक्षिसांची खैरात सुरू केलीय. जो कुणी कोयता गँगच्या आरोपीला पकडून आणेल त्याला बक्षीस (Reward) म्हणून रोख रक्कम देण्याची घोषणा पोलिसांनी केलीय. 

पोलिसांना बक्षीस जाहीर
त्यानुसार कोयता गँगचा आरोपी पकडून दिल्यास तीन हजारांचं बक्षीस देण्यात येईल. पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या आरोपीला 10 हजार तर फरार आरोपी पकडून दिल्यास त्यालाही 10 हजारांचं बक्षीस देण्यात येईल. मोक्का किंवा एमपीडीएतील आरोपी पकडल्यास 5 हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. हडपसर, फुरसुंगी भागात कोयता गँगची दहशत पाहायला मिळते. 

पुण्याला कोयता गँगचं ग्रहण
काही महिन्यांपासून पुण्याला कोयता गँगचं ग्रहण लागलंय. हातात कोयते घेऊन ही गँग दुकानांमध्ये तोडफोड करायची, रात्रीच्या अंधारात पार्किंगमध्ये उभ्या गाड्यांची तोडफोड करायची. काहीच दिवसात या गँगची हिंमत इतकी वाढली की भरदिवसा ही गँग दहशत माजवू लागली. विशेषत व्यापा-यांमध्ये दहशत माजवण्याचा या गँगचा प्रयत्न होता. या गँगनं केलेल्या तोडफोडीत लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. 

हे ही वाचा : हातावर What to do? लिहित विद्यार्थ्याची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर

कोयता गँगसाठी कोंबिंग ऑपरेशन
पोलिसांनी कुख्यात गुंडांची झाडाझडती घेतली. तब्बल 3,765 गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली. त्यात 698 गुन्हेगार एकाच पत्त्यावर राहत असल्याचं आढळलं. या गुंडांकडून पिस्तुलं, काडतुसं, 185 कोयते असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला कोयते पुरवणा-या बोहरी आळीतल्या एका दुकानदारालाही पोलिसांनी अटक केली.

पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतात. मात्र कोयता गँगचं पुण्याला ग्रहण लागलंय. कोयता गँगने जो धुमाकूळ घातलाय त्यामुळे पुणेकर हैराण आहेत. पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले, कोयता गँगच्या मुसक्याही आवळल्या.. मात्र सिनेस्टाईलनं भिंतींना शिडी लावत या गँगचे काही सदस्य जेलमधून फरार झाले.. त्यामुळे या गँगला पकडण्याचं तसंच नागरिकांमधील दहशत मिटवण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे.