धक्कादायक! प्रेमात ठरला अडसर म्हणून प्रियकराने अशी काढली 'खुन्नस'

प्रेमात अडसर ठरला म्हणून नवऱ्याचाच काटा काढला...पोलिसांनी 3 तासांत आवळल्या आरोपीच्या मुस्क्या

Updated: Oct 16, 2021, 10:01 PM IST
धक्कादायक! प्रेमात ठरला अडसर म्हणून प्रियकराने अशी काढली 'खुन्नस' title=

चंद्रपूर: प्रेमात अडथळा ठरणाऱ्याला संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही धक्कादायक घटना चंद्रपुरातील पडोली परिसरात घडली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. 45 वर्षीय व्यक्तीची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास करत अवघ्या तीन तासात आरोपीला गजाआड केलं आहे. 
 
जितेंद्र भंडारी असं आरोपीचं नाव आहे. या आरोपीचे एका महिलेसोबत 5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या दोघांच्या प्रेमात तिचा पती अडथळा ठरत होता. पतीचा काटा काढण्यासाठी आरोपीने योजना आखली. संधी पाहून त्याने आपल्या प्रेयसीच्या पतीला कायमचं संपवून टाकलं. 

पोलिसांच्या तपासातून ही हत्या प्रेमसंबंधातून झाल्याचं समोर आलं.  राजू अनंत मलिक या 45 वर्षीय व्यक्तीला आधी आरोपीने दारू पाजली. त्यानंतर त्याने संधी पाहून डोक्यावर हल्ला करून संपवलं. पोलिसांना 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह पडोली पोलीस ठाण्याच्या सिनर्जी वर्ल्ड परिसरातील मोकळ्या शिवारात आढळला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. 

पोलिसांनी अवघ्या तीन तासांत चौकशी करून आरोपीच्या मुस्क्या आवळल्या.  पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्याजवळून रॉड आणि अन्य पुरावे जप्त केल्याची माहिती मिळाली आहे.