मुंबई : सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. स्ट्रक्चरल ऑडिटर नीरज देसाई अटक केल्याची माहीती समोर येत आहे. नीरजवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीएसएमटी स्थानकाजवळील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ बळी तर ३१ जण जखमी झाले होते. यानंतर विरोधकांनी यावर कडाडून टीका केली होती. दुर्घटना घडल्यावर पालिकेने याची जबाबदारी रेल्वे प्रशासनावर टाकली होती. पण हा पूल आपल्याच अख्त्यारित असल्याची उपरती नंतर पालिकेला सुचली. यामध्ये जो कोणी आरोपी असेल त्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी होऊ लागली होती.
एलफिन्सटन तसेच अंधेरी पूल दुर्घटनेतून मुंबईकर सावरले नसताना सीएसटीएम दुर्घटनेने आणखी एक धक्का दिला. या पूल दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू तर ३१ जण जखमी झाले होते. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी स्वत:हून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. निरज देसाईची चौकशी सुरू झाली आहे.
त्याच्याविरुद्ध ३०४ अ ( निष्काळजीपणा...२ वर्षे शिक्षा) हे कलम काढून ३०४ भाग २ हे कलम लावण्यात आले आहे. ( ज्यामध्ये १० वर्षे शिक्षा होवू शकते.) निरज देसाई हे डी डी देसाई स्ट्रक्चरल असो.चा मालक आहेत.