दाभोलकर-पानसरे यांच्या हत्येप्रकरणी चौकशी, वेगळंच राजकारण सुरु

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी काही हिंदुत्ववादी संशयितांना अटक करण्यात आलीय.  

Updated: Aug 21, 2018, 07:57 PM IST
दाभोलकर-पानसरे यांच्या हत्येप्रकरणी चौकशी, वेगळंच राजकारण सुरु title=

औरंगाबाद : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी काही हिंदुत्ववादी संशयितांना अटक करण्यात आलीय. यानिमित्तानं सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी पुन्हा जोर धरतेय. दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरे याला सीबीआयने अटक केल्यानंतर आता चौकशीचा वेग आलाय. औरंगाबादेत एटीएस आणि सीबीआयच्या पथकाकडून अनेक ठिकाणी चौकशी सुरु असल्याची माहिती मिळतेय. यावरून वेगळंच राजकारण सुरु झालंय.

वैभव राऊत साधक नसला तरी सनातनच्या व्यासपीठावर तो आला असल्याचं उघड झालंय. वैभव राऊत हिंदू गोवंश रक्षा समितीचा तर सुधन्वा श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्तानचा सदस्य आहे. तर अंदुरे आणि शरद कळसकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे औरंगाबादच्या देवळाली परिसरातील मंजित प्राईड या इमारतीत एटीएसनं पहाटे छापा टाकला. या छाप्यात फ्लँट नं २०१४ मधून तीन संशयितांना चौकशीसाठी एटीएसनं ताब्यात घेतलंय. यातील एक सचिन अंदुरेचा नातेवाईक आहे, तर इतर दोन मित्र असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांमुळं सनातन संस्था पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरेंच्या हत्येप्रकरणी ज्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अटक झालीय, ते सनातनशी संबंधित असल्याचे धागेदोरे समोर आलेत. त्यामुळं वादग्रस्त सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या मागणीनं पुन्हा उचल घेतलीय. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडं पाठवण्यात आल्याचं गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं... 

केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी मात्र असा प्रस्ताव अजून आला नसल्याचं स्पष्ट केलंय.. प्रस्ताव आल्यावर कारवाई करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. केवळ शिवसेना-भाजपच नव्हे, तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही यावरून चांगलीच जुंपलीय. आपण मुख्यमंत्री असताना बंदीचा प्रस्ताव केंद्राकडं पाठवला होता, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. तर आपण केंद्रात मंत्री असताना असा प्रस्ताव आला नव्हता, अशी भूमिका माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेंनी घेतलीय.दरम्यान, जुन्या प्रस्तावाच्या आधारेच सनातनवर बंदी घालावी, असं सांगत राष्ट्रवादीनंही या राजकीय वादात उडी घेतलीय. राजकीय पक्ष सत्तेवर असताना आणि विरोधी पक्षात असताना कशा उलटसुलट भूमिका घेतात, हेच यावरून दिसून येतंय.

दरम्यान, नालासोपारा स्फोटकांप्रकरणी सनातन संस्थेचे अध्यक्ष जयंत आठवले यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.  एसटीएसच्या तपासात नाव समोर आलं तर आठवलेंची चौकशी  होणार असल्याचं महाराष्ट्र एसटीएसनं सांगितलंय. महाराष्ट्र एटीएस नालासोपारा स्फोटकांप्रकरणी वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आणि श्रीकांत पांगरकर यांची चौकशी करत आहे. हे चौघे सध्या एटीएसच्या कोठडीत आहेत.