अचानक पवार साहेबांनी शब्द फिरवला... पहाटेच्या शपथविधीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट

अजित पवार आणि शरद पवारांमधला संघर्ष तीव्र होत चालला आहे. सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या, तर आम्ही काय केलं? असा सवाल अजित पवारांनी केलाय. बारामतीत सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत त्यांनी सुप्रिया सुळेंसह शरद पवारांवर निशाणा साधलाय.

Updated: Apr 20, 2024, 08:16 PM IST
अचानक पवार साहेबांनी शब्द फिरवला... पहाटेच्या शपथविधीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट title=

Ajit Pawar Vs Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.. पहाटेच्या शपथविधीआधी अमित शाहा, फडणवीस, एक उद्योगपती, शरद पवार आणि मी यांच्यात 5 ते 6 बैठका पडल्या होत्या. मात्र मुंबईत आल्यानंतर अचानक पवार साहेबांनी शब्द फिरवला. मी मात्र शब्दावर ठाम राहात शपथ घेतली  असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला आहे. शरद पवारांनी मात्र अजित पवारांचा दावा खोडून काढला आहे. तर, भाजपसोबत जाण्यासाठी आमची संमती कधीच नव्हती आणि नसेल असा खुलासा शरद पवारांनी केला आहे.

सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या, तर आम्ही काय केलं? असा सवाल अजित पवारांनी केलाय. बारामतीत सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत त्यांनी सुप्रिया सुळेंसह शरद पवारांवर निशाणा साधलाय. शरद पवारांनी मला खासदार केल्यावर एकाचा जन्म झाल्याचं सांगत रोहित पवारांवरही टीका केली. आता तो सांगतो की साहेबांनी सर्व संस्था काढल्या. 31-32 वर्षे मी नुसताच शांत बसलो. मी काहीच केलं नाही का?. बारामती जी काही सुधारली ती इतरांमुळे सुधारली. माझा काडीचाही संबंध नाही? असा सवालही त्यांनी विचारला. 

विरोधक जे आरोप करायचे तेच आरोप अजित पवार आता शरद पवारांवर करत आहेत. दाऊदशी संबंध आणि भूखंडाचं श्रीखंड खाल्लाचा जुना आरोप अजित पवारांनी उकरून काढला आहे. राष्ट्रवादीमधल्या फुटीनंतर काका आणि पुतण्यामधला संघर्ष तीव्र झाला आहे. आता तर बारामतीमधल्या साखर कारखान्यांवरुन अजित पवारांनी शरद पवारांवर तोफ डागली आहे.

याआधी बटण दाबा तरच निधी देतो या अजित पवारांच्या विधानावरुन शरद पवारांनी फिरकी घेतली होती. आता तर पहाटेच्या शपथविधीवरुनही काका आणि पुतणे आमनेसामने आले आहेत.  पहाटेच्या शपथविधीआधी अमित शाहा, फडणवीस, एक उद्योगपती, शरद पवार आणि माझ्यात 5 ते 6 बैठका पडल्या होत्या.  मात्र मुंबईत आल्यानंतर अचानक पवार साहेबांनी शब्द फिरवला. असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केलाय.  राष्ट्रवादीमधल्या फुटीनंतरही ही पहिलीच निवडणूक आहे. काका आणि पुतण्या दोघेही लढाईत एकमेकांवर कशी कुरघोडी करता येईल हे पाहतायत. आता या संघर्षात कोण सवाई ठरतो हे निवडणुकीतल्या निकालानंतरच कळेल. 

शरद पवारांकडून लोकांना भावनिक केलं जातंय, असा आरोप अजित पवारांनी केलाय. कालच्या पवारांच्या सभेत अमेरिकेच्या पत्रकारांसह अनेक पत्रकार मंडळी आली होती. शरद पवार खुर्चीवर बसले होते. तर सुप्रिया, रोहित आणि युगेंद्र पायापाशी बसले होते. अख्खं कुटुंब जवळ घेऊन बसले होते. म्हणजे हे अमेरिकेतही पोहोचलंय की बघा कुटुंब कसं एक आहे, असा घणाघात अजित पवारांनी केलाय.