Rahul Gandhi : हिंमत असेल तर... सावकरांच्या मुद्दयावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना डिवचले

Maharashtra Politics :  सावरकरांचा अपमान करणा-या राहुल गांधींच्या थोबाडात द्यायची हिंमत दाखवणार का, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ठाकरेंना सवाल केला आहे.  राज्यभर सावरकर गौरव यात्रेची घोषणा उपमुख्य देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

Updated: Mar 27, 2023, 04:31 PM IST
Rahul Gandhi : हिंमत असेल तर... सावकरांच्या मुद्दयावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना डिवचले title=

Maharashtra Politics :  माझं नाव सावरकर नाही, माझं नाव गांधी आहे. गांधी माफी मागत नाहीत असं वक्तव्य राहुल गांधीं यांनी केले. सावरकरांच्या मुद्द्यावरुन आघाडीत बिघाडी झाली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत.. अपमान सहन करणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी  राहुल गांधींना ठणकावलं. तर, सत्ताधारी या वक्तव्यामुळे राहुल गांधीवर तुटून पडले आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या भूमिकेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर केली आहे. सत्तेला लाथ मारायची हिंमत यांच्यात नाही. यामुळे फक्त भाषणात सावरकरांचा गौरव होईल असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. सावकरांच्या मुद्दयावरुन देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना डिवचले आहे. 

ठाकरेंनी राहुल गांधींना फटकारलं

मालेगावमधल्या सभेमधून उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींनाही ठणकावलं. स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत आहेत. त्यांचा अपमान सहन करणार नाही. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना फटकारले. तर, सावरकरांचा अपमान होत असताना उद्धव ठाकरे त्यांच्या मांडीला मांडी लावून का बसले आहेत असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. 

नाना पटोलेंनी सावरकर या विषयावर बोलणं टाळलं

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा लढा गुलामगिरीविरोधात होता हे विसरू नका असं संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना ठणकावलंय. आम्ही सोबत आहोत पण सावरकरांचा अपमान सहन करणार नाही हे राहुल यांची भेट घेऊन त्यांना सांगणार असल्याचं राऊत म्हणाले. तर समान किमान कार्यक्रमात सावरकर हा मुद्दा नव्हता असं सांगत नाना पटोलेंनी सावरकर या विषयावर बोलणं टाळलं. 

नेमकं काय  म्हणाले होते राहुल गांधी

माझं नाव सावरकर नाही, माझं नाव गांधी आहे, गांधी कुणाची माफी मागत नाहीत, असं राहुल गांधींनी म्हटलंय. मला जेलमध्ये टाका, धमकावा तरी मी प्रश्न विचारतच राहणार आणि सत्याची लढाई लढणार, असं राहुल गांधींनी म्हटलंय. माझी खासदारकी कायमची गेली तरी मी लोकशाही अबाधित ठेवायला लढणार, असं त्यांनी स्पष्ट केलंय. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यावर राहुल गांधींनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पुन्हा अदानींवर घणाघात करत अदानींना मोदी का वाचवतायत, असा सवाल राहुल गांधींनी केला. अदानी प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठीच खासदारकी रद्द केल्याचा आरोप त्यांनी केला. तर राहुल गांधींनी माफी न मागितल्यामुळेच त्यांना शिक्षा झाल्याचं भाजपनं म्हटल आहे.