राज्यातला सत्तासंघर्ष सरसंघचालकांच्या कोर्टात

बंद दाराआड मुख्यमंत्री आणि सरसंघचालकांची चर्चा 

Updated: Nov 6, 2019, 12:21 AM IST
राज्यातला सत्तासंघर्ष सरसंघचालकांच्या कोर्टात  title=

अमर काणे, झी २४ तास, नागपूर : मंगळवारी सायंकाळी उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांची भेट घेतली.मुख्यमंत्री फडणवीस सरसंघचालकांशी चर्चा करण्यासाठी विमानतळाहून थेट संघ मुख्यालयात दाखल झाले. बंद दाराआड मुख्यमंत्री आणि सरसंघचालकांच्या चर्चे पार पडली. आपल्या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस शिवसेना आणि भाजपातली परिस्थिती सरसंघचालकांच्या समोर मांडण्याची शक्यता आहे. फडणवीस आणि उद्धव यांच्यातला दुरावा मिटवणारा 'सशक्त मध्यस्थ' म्हणून सरसंघचालक भूमिका बजावणार का? हे पाहणंही उत्सुकतेचं ठरतंय.

राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडींनी पुन्हा एकदा वेग घेतलाय. निकाल लागून १३ दिवस उलटले तरी युतीतल्या चर्चेची कोंडी काही फुटण्याचं नाव घेत नाही. दरम्यान, राज्यातला हा पेच सोडवण्यासाठी मोहन भागवतांनी सर्वोच्च प्राध्यान्य द्यावं आणि नितीन गडकरींना मध्यस्थी करायला सांगावी, अशी मागणी करणारं एक पत्र उद्धव ठाकरेंचे सल्लागार किशोर तिवारी यांनी मोहन भागवतांना धाडलं होतं. त्यानंतर, मंगळवारी लगेचच मुख्यमंत्री संघाच्या मुख्यालयात हजर झाले.

सध्या, शिवसेना भाजपाच्या कुठल्याही प्रस्तावाला दाद देत नाही. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेत कुठल्याही प्रकारची चर्चा सुरू नाही. वर्षावरुन मातोश्रीवर गेलेले फोन उचलले जात नाहीत, अशीही चर्चा आहे. 'भाजपा - शिवसेनेत जेवढं ठरलंय तेवढं मार्गी लावा... इतर काहीही नको, अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे, ती भाजपाने पूर्ण करावी' असा शिवसेनेचा होरा कायम असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.   

शरद पवार निघाले दौऱ्याला

दुसरीकडे, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीत काहीही ठोस ठरलेलं नाही, असं शरद पवार यांनी म्हटलंय. 'बाकी कुणी काही चर्चा करत असेल तर मला माहीत नाही... मी दौऱ्यावर निघालोय... १० नोव्हेंबरला मी मुंबईत परतणार आहे. शिवसेना आणि भाजपा एकत्र आहेत. त्यांनी लवकरात लवकर आपले धोरण ठरवावे. आम्ही वाट पाहत आहोत' असं म्हणत पवार यांनी या चर्चेतून अंग काढून घेतलंय.