Devendra Fadnavis On Chhatrapati Shivaji Maharaj Surat Loot: "छत्रपती शिवरायांनी सुरत लुटली नाही असा जावईशोध देवेंद्र फडणवीस यांनी लावला. शिवरायांचा मर्दानी इतिहास संपविण्यासाठी फडणवीस यांनी सुरू केलेल्या मोहिमेचाच हा एक भाग आहे. शिवराय व त्यांनी घडवलेल्या इतिहासाचा आणखी एक अपमान करण्याचा प्रमाद देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. छत्रपतींचा रोज एक अपमान करावा असे धोरण फडणवीस व त्यांच्या भाजपने स्वीकारले आहे काय?" असा सवाल करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्याच्या गृहमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. "शिवरायांच्या लढ्यात आग्य्राहून सुटका व सुरतेची लूट हे दोन रोमांचकारी प्रसंग आहेत. त्याशिवाय इतिहास पुढे सरु शकत नाही. आता महामहोपाध्याय फडणवीस म्हणतात, ‘‘सुरतेवर महाराजांची स्वारी झालीच नव्हती. काँग्रेसने देशाला चुकीचा इतिहास शिकवला.’’ महाराजांनी सुरत लुटली ती स्वराज्यासाठी व त्या वेळी काँग्रेसचा जन्म झाला नव्हता. इंग्रज, पोर्तुगीज इतिहासकारांनी महाराजांनी केलेल्या सुरतेवरील स्वारीची पक्की नोंद घेतली आहे, पण म.मो.पाध्याय फडणवीसांना ते मान्य नाही," असा टोला ठाकरेंच्या सेनेनं लागवला आहे.
"मालवणात शिवरायांच्या पुतळ्याची मोडतोड केली त्याप्रमाणे इतिहासाचीही मोडतोड करण्याची सुपारी फडणवीसांनी घेतली आहे व महाराष्ट्रासाठी हे घातक आहे. फडणवीस हे सध्या गुजरातचे राजकारणी व व्यापार मंडळाचे मिंधे झाले आहेत. महाराजांनी सुरत लुटली ही जखम आजही भळभळत असल्याने सुरतच्या बदल्यात मुंबई लुटण्याचे काम मोदी-शहांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. सुरत महाराजांनी लुटली असा इतिहास गुजरातच्या व्यापार मंडळास मान्य नाही. त्यामुळे फडणवीस शिवरायांचा इतिहास बदलू पाहत आहेत. फडणवीस यांना पेशव्यांचा, स्वतःच्या पक्षाचा, स्वातंत्र्य लढ्यातील श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या इंग्रजधार्जिण्या धोरणांचा इतिहास माहीत नाही तेथे शिवरायांच्या जीवन चरित्राचे पैलू त्यांना कसे माहीत असतील?" असा टोला 'सामना'च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
"शिवाजी महाराजांनी सुरत एकदा नव्हे, दोनवेळा लुटली. सुरतेच्या दुसऱ्या लुटीची बातमी युरोपमधील ‘द लंडन गॅझेट’ या दैनिकात 20 फेब्रुवारी 1672 रोजी पहिल्या पानावर प्रसिद्ध झाली होती. 352 वर्षे जुन्या अत्यंत दुर्मिळ अशा वर्तमानपत्राची अस्सल प्रत पुण्याच्या मालोजीराव जगदाळे यांनी मिळवून भारतात आणली. त्यामुळे सुरतच्या लुटीवर ज्या ‘संघी’ इतिहासकारांनी कायम प्रश्नचिन्ह निर्माण केले ते उघडे पडले. महाराजांनी सुरत लुटली याची नोंद लंडनमधील ऐतिहासिक संग्रहालयात आहे व महाराजांच्या नकली, बनावट वाघनखांची राजकीय मिरवणूक काढणाऱ्या फडणवीस यांनी सुरत लुटीचा इतिहास इंग्लंडला जाऊन नजरेखालून घालायला हवा. शिवाजी महाराजांच्या सुरतेवरील स्वारीची माहिती सुरतेत असणाऱ्या इंग्रजी अधिकाऱ्यांनी ‘द लंडन गॅझेट’च्या संपादकांना पाठवली होती. ती जशीच्या तशी प्रसिद्ध झाली," असंही ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.
"या बातमीच्या पहिल्याच परिच्छेदात लिहिले आहे, ‘शिवाजी एक क्रांतिकारी बंडखोर (रिबेल), ज्याने मोगलांना अनेक लढायांत चारीमुंड्या चीत केले आहे, तो आता जवळ जवळ सबंध देशाचा शासनकर्ता बनलेला आहे.’ भारतातील राजकीय घडामोडींना ‘द लंडन गॅझेट’ महत्त्व देत असे. हे वृत्तपत्र इंग्लंडच्या राजाचे अधिकृत मान्यता असलेले वृत्तपत्र होते. ‘द लंडन गॅझेट’ हे ब्रिटिश राजघराण्याचे अधिकृत मुखपत्र मानले जात होते व त्यातील बातम्या जगभर पोहोचाव्यात यासाठी विशेष प्रयत्न तेव्हा केले जात होते. शिवरायांनी सुरतवर स्वारी केली व लूट केल्याची बातमी पहिल्या पानावर आली हे महत्त्वाचे व ऐतिहासिक आहे. शिवाजी महाराजांना स्वराज्य उभारणीसाठी धनाची आवश्यकता होती. सुरत हे मुघलांचे प्रमुख बंदर होते. याच बंदरातून मुघलांचा व्यापार पर्शियन आखातापर्यंत चालायचा. इथे अनेक धनाढ्य व्यापारी होते. त्यामुळे सुरत लुटली तर मुघलांना जरब बसेल आणि स्वराज्य निर्मितीसाठी हाती संपत्ती येईल या विचाराने महाराजांनी सुरतेवर स्वारी केली. सर जदुनाथ सरकार यांनी त्यांच्या ‘Shivaji and his Times’ या ग्रंथात सुरत लुटीची कहाणी पुराव्यासह मांडली आहे," असं ठाकरेंच्या सेनेनं म्हटलं आहे.
"आता चारशे वर्षांनंतर फडणवीस यांनी नवा इतिहास मांडला व महाराजांनी सुरत लुटली नाही असे जाहीर केले. सुरतमध्ये तेव्हा इंग्रजांच्या वखारी होत्या. सुरतमध्ये पोर्तुगीजांचीही वळवळ सुरू होती. या सगळ्यांकडे अफाट संपत्ती होती व मोगलांना त्यातील मोठा वाटा मिळत होता. मोगलांच्या आर्थिक नाड्या तोडण्यासाठी सुरत लुटायला हवी हे महाराजांचे धोरण होते व त्यानुसार सुरतवर स्वारी करून महाराजांनी दाणादाण उडवली, हे ऐतिहासिक सत्य असताना महामहोपाध्याय फडणवीस शिवरायांचा नवा इतिहास मांडून काय साध्य करीत आहेत?" असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने विचारला आहे. "म.म. फडणवीस यांना शिवरायांचे शौर्य मान्य नसावे, हे पहिले किंवा सुरत महाराष्ट्राच्या राजाने लुटली ही जखम सध्याच्या गुजराती व्यापार मंडळास अस्वस्थ करीत असेल. त्यामुळे सुरत लुटीशी शिवरायांचा संबंध नसल्याची बतावणी म.म. देवेंद्र फडणवीस यांनी केली असावी, हे दुसरे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व महाराष्ट्राच्या निर्मितीत शून्य योगदान असलेल्यांची ही पिलावळ आहे. यांनी देश लुटला ते चालते, पण महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी सुरत लुटली हा इतिहास ते बदलायला निघाले आहेत," असा टोला लेखाच्या शेवटी लगावला आहे.