ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, धाराशिव : मजुरांना साखर दंडाने बांधून गुलामासारखी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिव (Dharashiv Crime) जिल्ह्यात घडला आहे. आरोपी ठेकेदार दिवसभर या मजुरांकडून विहीर खोदायचे काम करून घ्यायचे. त्यानंतर रात्री मजूर पळून जाऊ नये म्हणून त्यांच्या पायाला साखळदंडाला बांधून ठेवत त्यांना मारहाण केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. हा सर्व प्रकार समोर येताच पोलिसांनी (Dharashiv Police) घटनास्थळी जाऊन एकूण 11 मजूरांची सुटका केली आहे. यातील बहुतेक जण हे जालना, वाशिम येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
ढोकी पोलिसांनी या पीडित 11 मजुराची सुटका केली असून त्यांचा छळ करणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना समोर येताच एकच खळबळ उडाली आहे. या मजुरांची कामाच्या बहाण्याने फसवणूक करुन त्यांच्याकडून जबरदस्तीने कामकाज करवून घेतले जात असल्याचे समोर आले आहे. दोन ठिकाणी अशाच प्रकारे मजुरांना वागणूक दिली जात असल्याचे पीडितांनी सांगितले. मजुरांना कामाच्या ठिकाणी आणल्यानंतर आधी जेवू घातले जात होते. त्यानंतर दारु पाजून त्यांना झोपवले जात. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांना उठवून त्यांच्याकडून काम करवून घेतले जात होते. त्यानंतर संध्याकाळी त्यांना साखळदंडाने बांधून मारहाण करण्यात येत होती.
धाराशिव तालुक्यातील वाखरवाडी येथे संदीप रामकिसन घुसके(रा कवठा, ता सेनगाव,जिल्हा हिंगोली) हा ठेकेदार धाराशिव जिल्ह्यातील वाखारवाडी येथे मजुरांकडून विहिरीचे काम करून घेत होता. हे मजूर पळून जाऊ नयेत म्हणून त्यांना साखळ दंडाने बांधून रात्री मारहाण केली जात होती. ढोकी पोलिसांना ही माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. त्या ठिकाणी 11 मजुरांना साखळदंडाने बांधून ठेवलं असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी या 11 ही मजुराची सुटका करून त्यांना ढोकी पोलीस ठाण्यात आणले . यावेळी या मजुरांनी ठेकेदार आपल्याला मारहाण करीत असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. यावरून संबंधित ठेकेदाराविरोधात ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी काय सांगितले?
"एका व्यक्तीला साखळदंडाने बांधून त्याच्याकडून जबरदस्तीने काम करवून घेतले जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली. सुरुवातीला आम्हाला विश्वास बसला नाही. त्यानंतर आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आणि एक पथक तपासासाठी पाठवले. तिथे जाऊन पाहिले असता पाच मुले विहीरीत काम करत असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की आमच्याकडून जबरदस्तीने काम करवून घेतले जात आहे आणि आम्हाला साखळदंडाने बांधून ठेवण्यात येते. त्यानंतर मुलांनी आणखी सहा मुलांसोबतही असाच प्रकार घडत असल्याचे त्याने सांगितले. त्या मुलांना पोलीस ठाण्यात आणले असून याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे," अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांनी दिली.
"फसवणूक करुन आम्हाला इथे कामाला लावण्यात आले. त्यानंतर सकाळी सात ते संध्याकाळी सात पर्यंत आमच्याकडून काम करुन घेतले जात होते. जेवणही एकाच वेळी देत होती. आरोपी आम्हाला मारहाण करायचे, साखळदंडाने बांधून ठेवायचे. त्यानंतर संध्याकाळी दोन ग्लास हातभट्टीची दारु द्यायचे. त्यामध्ये काय मिसळायचे आम्हाला माहिती नाही पण ते प्यायल्यावर माणसे सुन्न पडायची," असे एका मजुराने सांगितले.