डोंबिवली MIDC परीसरात बचाव पथकाने वाचवला श्वानाचा जीव, 3 तासांपासून बरणीत अडकली होती मान

Dombivli MIDC Blast: श्वानाची मान बरणीत अडकली होती. बचाव कार्याच्या मदतीने श्वानाची मान बाहेर काढण्यात आली. यामुळे श्वानाचे प्राण वाचले. 

Updated: May 23, 2024, 05:20 PM IST
डोंबिवली MIDC परीसरात बचाव पथकाने वाचवला श्वानाचा जीव, 3 तासांपासून बरणीत अडकली होती मान  title=
Dombivli MIDC Dog

Dombivli MIDC Blast Latest News: मे महिन्याच्या कडक उन्हाचा त्रास सर्वांनाच होतोय.  त्यात भटक्या प्राण्यांची अवस्था तर वाईटच आहे. पाण्यासाठी भटके प्राणी वणवण भटकत असतात. कुठे थोडासा ओलावा जाणवला की पाणी आहे का ते तपासून पाहतात. अशाच पाण्याच्या शोधात असलेल्या श्वानाची मान बरणीत अडकली होती. तब्बल 3 तास हा श्वान तशाच अवस्थेत फिरत होता. परिसरातील नागरिकांना या श्वानाची दया आली. अखेर बचाव कार्याच्या मदतीने श्वानाची मान बाहेर काढण्यात आली. यामुळे श्वानाचे प्राण वाचले. 

सुटका होईल म्हणून डोके आपटत होता

बुधवारी सकाळी डोंबिवली एमआयडीसी परिसरात हा प्रकार स्थानिकांच्या निदर्शनास आला. बरणीत पाणी असेल म्हणून श्वानाने त्यात मान घातली. पण बरणीचं तोंड अरुंद होतं, त्यामुळे त्याची मान त्यात अडकली. त्याने मान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरत होता. बरणी असलेले डोके आपडून आपली त्यातून सुटका होईल, या उद्देशाने तो डोके आपटत होता. पण त्याचाही काही फायदा होत नव्हता. आजुबाजूला असलेल्या रहिवाशांच्या हा प्रकार लक्षात आला. काहींनी त्याची मान बाहेर काढण्याचा प्रयत्नदेखील केला. अखेर सामाजिक कार्यकर्ते नंदू ठोसर यांच्या पुढाकाराने डोंबिवलीतील प्लॉंट अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर म्हणजेच पॉज या संस्थेला पाचारण करण्यात आले. या संस्थेच्या बचावर पथकाने आवश्यक साधनांसह घटनास्थळी धाव घेतली. 

आकडी गळ्याभोवती अडकवली

श्वानाला श्वास घेण्यास त्रास होत होता.  पण तो सहजरित्या कोणाच्या हातीही लागत नव्हता. बचाव पथकात असलेल्या महेश साळुंखे यांनी श्वानाची मान बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांनी आपले सर्व कौशल्य पणाला लावले. प्राणी पकडण्याची आकडी त्यांनी श्वानाच्या गळ्याभोवती अडकवली. आकडीवरील दोरीमुळे श्वान एकाच जागी स्थिरावला. यानंतर श्वानाला कोणतीही इजा होणार नाही, याची काळजी घेण्यात आली. यानतंर प्लास्टिक बरणीचा भार गोलाकार पद्धतीने कापण्यात आला. ही सर्व प्रक्रिया सुरु असताना श्वास शांत होता.

वैद्यकीय तपासणी करुन सुटका

सुखरुप सुटका झाल्यानंतर श्वान इकडे तिकडे पाहू लागला. दरम्यान त्याची वैद्यकीय तपासणी करुन आणि आवश्यक उपचार करुन त्याला त्याच भागात सोडण्यात आल्याची माहिती पॉज वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक संचालक निलेश भणगे यांनी दिली.