फॅमिली फोटो टाकाल तर कंगाल व्हाल? फेसबुक अकाऊंटमुळे झालं मोठं नुकसान

फेसबुक फोटो अपलोड करताना सावधान! ही चूक कराल तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल

Updated: Sep 23, 2021, 08:20 PM IST
फॅमिली फोटो टाकाल तर कंगाल व्हाल? फेसबुक अकाऊंटमुळे झालं मोठं नुकसान title=

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : आपल्याला प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट करायची सवय असते. अगदी आपण कुठे जातो काय करतो इथपासून ते आपल्या कुटुंबासोबतचे फोटोही अनेकदा शेअर करत असतो. मात्र अति सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणं कधीतरी महागात पडू शकतं.  तुम्ही जर फेसबुकवर तुमचे फोटो ठेवत असाल तर सावध राहा. कारण तुमचे फोटो वापरून मोठी फसवणूक होऊ शकते. तुमच्या फेसबुक अकाऊंटववरून तुमचा फ्लॅट हडपला जाऊ शकतो. 

फेसबुकवर आपला तसच कुटुंबियांचा फोटो ठेवणं तसं नवीन नाही. मात्र हेच फोटो तुमच्या संपतीवर टाच आणू शकतात किंवा तुम्हाला फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकवू शकतात. असाच काहीसा प्रकार जळगावमध्ये घडलाय. पुजा झंवर आणि हरिष झंवर या दाम्पत्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.  

पिंप्राळा येथील दिनेश रामचंद्र ऊर्फ रमेशचंद्र तिवारी यांनी एका फ्लॅटच्या व्यवहारासंदर्भात झंवर दाम्पत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात जामिनावर मुक्त झाल्यानंतर तिवारी यांनीच झंवर यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

झंवर दाम्पत्यानं गुन्ह्यातील फिर्याद वाचली तेव्हा सौदा पावतीवर 2017 मध्ये 30 लाख 47 हजारांचा तर 2018 मध्ये दहा लाख रुपयांचा बोजा असल्याचा उल्लेख दिसला. प्रत्यक्षात या दाम्पत्यानं अशी कुठलीच सौदा पावती केलेली नव्हती. कागदपत्रांवरील साक्षीदारांनाही ते कधी भेटलेले नव्हते. 

रक्षाबंधनाच्या दिवशी काढलेले फोटो या दाम्पत्यानं फेसबुकवर अपलोड केले होते. त्याच फोटोच्या आधारे झवंर दाम्पत्याच्या नावाने खोटा दस्ताऐवज तयार केल्याचं समोर येत आहे. आता झंवर दाम्पत्याच्या तक्रारीवरून रमेशचंद्र तिवारी यांच्यासह सहा जणांविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणातून फेसबुकच्या आधारे फसवणूक करणारी मोठी टोळी सक्रिय असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे सोशल मीडियात वावरत असताना सतर्क राहा, नाहीतर तुम्ही अपलोड केलेला फोटो कुणाच्या तरी खरेदी-विक्री खतावर दिसू शकतो.