Chhagan Bhujbal: सांताक्रुझमधील डोरीन फर्नांडिस यांना तब्बल 19 वर्षांनी मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधातील प्रकरणात न्याय मिळाला आहे. 78 वर्षांच्या डोरीन फर्नांडिस यांना भुजबळ कुटुंबीयांना साडेआठ कोटींची थकबाकी दिली आहे. अजंली दमानिया यांनी फर्नांडिस कुटुंबीयांना थकबाकी मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता.
सांताक्रुझ येथे डोरीन फर्नांडिस यांचे वडिलोपार्जित घर होते. तिथे भुजबळ कुटुंबीयांनी 20 वर्षांपूर्वी इमारत बांधली होती. मात्र ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे पूर्ण रक्कम दिली गेली नाही, असा दावा करण्यात आला होता. मात्रा अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर अखेर फर्नांडिस यांच्या खात्यात 8.41 कोटींची रक्कम पर्वेश कन्स्ट्रक्शन यांच्याकडून जमा करण्यात आली आहे. ही कंपनी छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळ यांच्याशी संबंधित आहे.
गेल्या दोन दशकापासून फर्नांडिस कुटुंबीय या लढा लढत होते. या कालावधीत त्यांच्या पतीचाही मृत्यू झाला. डोरेन फर्नांडिस या त्यांच्या तीन स्वमग्न (Autistic) मुलांसोबत राहतात. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी 2014 ते 15 दरम्यान हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, काही कारणाने हे प्रकरण पुन्हा शांत झाले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून दमानिया यांनी फर्नांडिस कुटुंबीयाची आर्थिक परिस्थिती प्रसारमाध्यमांसमोर आणली होती. तसंच, या कुटुंबीयांला न्याय देण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमु्ख्यमंत्र्यांना केली होती.
डोरीन फर्नांडिस यांना थकित रक्कम मिळाल्यानंतर अजंली दमानिया यांनी ट्विटर अकाउंटवर पोस्ट केली आहे. भुजबळ कुटुंबीयांनी 20 वर्षांनंतर अखेर डोरीन फर्नांडिस यांना थकबाकी परत केली आहे. डोरीन यांना आता त्यांच्या 3 मुलांच्या भविष्याची चिंता करण्याची गरज नाहीये. माझ्या आयुष्यातील हा सर्वाधिक समाधान देणारा क्षण आहे, अशी भावना दमानिया यांनी व्यक्त केली आहे.
छगन भुजबळ यांनीही याप्रकरणात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, ते चुकीचं आहे. तीस वर्षे लागलेली नाही 2014 मध्ये इमारत बांधून पूर्ण झाली आहे. आधीच्या बिल्डरने त्यांना पैसे दिले होते त्यानंतरही त्यांनी कोर्ट कचेरी केली त्यामुळे आता परत त्यांना पैसे दिले आहेत.