नादखुळा! मटकीला मोड न्हाय-भाऊला तोड न्हाय, पाहा दारु पिणारा कोंबडा

सांगलीत अण्णा अण्णा' असं ओरडणारा कोंबडा वर्षभरापूर्वी सापडला होता. मात्र आता यापेक्षा कहर करणारा आणखी एक वरचढ कोंबडा सापडलाय.

Updated: Jun 3, 2022, 10:18 PM IST
नादखुळा! मटकीला मोड न्हाय-भाऊला तोड न्हाय, पाहा दारु पिणारा कोंबडा title=

प्रवीण तांडेकर, झी २४ तास, भंडारा : सांगलीत अण्णा अण्णा' असं ओरडणारा कोंबडा वर्षभरापूर्वी सापडला होता. मात्र आता यापेक्षा कहर करणारा आणखी एक वरचढ कोंबडा सापडलाय. साधारणपणे पिण्याचा बेत असला की चकना म्हणून चिकन लागू असतंच. पण हे कोबंडं असलं बिलंदरे की याचा कारनामा ऐकून तुम्ही चाट पडाल. (drunker cock in bhandara district video viral on social media)

त्याचं असंय की जो कोंबडा आपण दारुसोबत चवीला खातो, तोच कोंबडा चक्क दारु पितो. हो हो, दारु पिणारा कोंबडा. आता तुम्हाला वाटेल की ही सर्व बडबड नशेत सुरुय, पण नाही. विशेष म्हणजे हा कोंबडा विदेशी दारू प्यायल्याशिवाय एक दाणा खात नाही. या दारु पिणाऱ्या बेवड्या कोंबड्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. 

विदर्भातील भंडारा जिल्ह्यात हा पेताडपिऊ कोंबडा सापडलाय. भंडाराऱ्यातील पिपरीतील भाऊ कोतोरे यांचा हा कोंबडा. भाऊ कोतोरे हे पुनर्वसन झालेल्या गावात शेती करुन आपला उदरनिर्वा करतात. 

शेतकरी म्हटल्यावर हलव्या मनाचा माणूस. आपल्या मुलाबाळांप्रमाणे प्राण्यांवर-पक्षांवर जीव लावतात. तसाच जीव भाऊंनी या कोंबड्यावर लावला. पण हे गाभडं पेताड निघालं.

त्यांनी कोंबड्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. पण कसलं काय, भाउंचा अपेक्षाभंग झाला. काही केल्या हे कोंबडं पाणी पियेना. मग भाऊंनी घरात जात थेट क्वार्टर काढली क्वार्टर. ती ही चक्क विदेशी.  

त्याच पाण्याच्या वाटीत ती दारु टाकली आणि चम्तकार झाला चम्तकार. कोंबडा रपरप दारु प्यायला लागला. इतकंच नाय, प्यायल्यानंतर खाल्लंही. भाउचा नादखुळा. बरं तुम्हाला वाटलं असेल की हा कोंबडा अट्टल बेवडाय. पण तसं नाहीये. 

कोंबड्याला 'मरी' हा आजार झाला. आजारावर कोणीतरी मोहाच्या दारुचा हा इलाज सांगितला. इलाज म्हणून दारु, आहा.. नसिब अपना अपना. 

मोहाची दारू सहसा मिळत नाय.  आपल्या लाडक्या कोंबड्यासाठी भाऊंनी चक्क विदेशी मद्य आणलं.  त्यानं रोग तर बरा झाला. 

पण आता हा कोंबडा पक्का पट्टीटा पिणारा झालाय. हा कोंबड्याला 4 दिवसाला 1 क्वार्टर लागतेय. म्हणजे दिवसाला 45 ml.त्यामुळे भाउंना कोंबड्यासाठी महिन्याकाठी 2 हजार रुपये मोजावे लागतायेत.  

भाऊ कोंबड्याचं व्यसन सोडवण्याचा प्रयत्न करतायत. त्यासाठी त्यांनी पशूवैद्यांनाही दाखवलंय. पण त्याचा उपयोग झाला नाही. पशूवैद्यक अधिकाऱ्यांनी मात्र यामुळे कोंबड्याला कोणताही अपाय होणार नसल्याचं सांगितलंय.

या कोंबड्याचा व्हीडिओ सध्या जाम व्हायरल होतोय. कोंबडा कातोरेंच्या घरात सगळ्यांचाच लाडका आहे. त्यामुळे तो व्यसनाधीन झाला असला तरी त्याचे हे लाडही पुरवले जातायत. मात्र त्याच्या या अजब सवयीमुळे पंचक्रोशीत तो चर्चेचा विषय झालाय, हे मात्र नक्की..