जयेश जगड, झी मीडिया, अकोला : ऐन दिवाळीत अकोला जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. मागच्या चार दिवसांतील पावसानं अकोला जिल्ह्यात पार होत्याचं नव्हतं केल आहे. खरीपातील सोयाबीन, ज्वारी, कापूस अन इतर पिकांचं मोठं नुकसान पावसामूळे झालंय. पावसाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील पातूर तालूक्याला बसला आहे. मात्र प्रशासनाकडून याची कोणतीही दखल अद्याप घेण्यात आली नाही आहे. आज बाळापुरटे नवनिर्वाचित सेना आमदार नितीन देशमुखांनी या भागाचा दौरा केला आहे. हवालदिल शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे.
अकोला जिल्ह्यातील परतीच्या पावसामूळे शेतकऱ्यांच्या ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पावसानं सोयाबीन, कापूस आणि भाजीपाला पिकं अक्षरश: मातीमोल झाली आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालूक्याला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. काढणीला आलेल्या ज्वारी, सोयाबीनची अक्षरश: माती झाली आहे. पावसामूळे उभ्या पिकाला कोंब फुटलेय. हे आहेयेत पातूर तालूक्यातील देऊळगावचे शेतकरी गजानन गोळे... त्यांच्या शेतातील दहा एकरातील सोयाबीन काढणीला आले आहे. हाती पैसा येईल असं स्वप्नं रंगवणार्या मुरारी यांचा पावसानं घात केला. अन घरात येणारी सोयाबीनची सुगी मातीमोल झाली.
जिल्ह्यातील सातही तालूक्यात पावसाचा फटका पिकांना बसलाय. मात्र, एव्हढं नुकसान होऊनही शासकीय पातळीवर याबद्दल सामसुम आहे. सर्वाधिक नुकसान झालेल्या पातूर तालूक्याचा आज सेनेचे नवनिर्वाचित आमदार नितीन देशमुखांनी दौरा केला. तातडीने नुकसानीचे सर्व्हे करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली.
राज्यातील शेतकर्यांचे अश्रू पुसायला व्यवस्था अन सरकारला खरंच वेळ आहे का ? परतीच्या पावसामूळे शेतकर्यांच्या डोळ्यातील पाण्याचं दु:ख सरकारनं समजून घ्यावं, हिच सदिच्छा व्यक्त होत आहे.