हिंगोली : दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेले लाखो विद्यार्थी सध्या निकालाची वाट पाहत आहेत. त्यातच आता दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
बारावीच्या परीक्षेचा निकाल १५ ते २० जुलैदरम्यान, तर दहावीच्या परीक्षेचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. हिंगोलीच्या पालकमंत्री असलेल्या वर्षा गायकवाड यांनी हिंगोलीच्या दौऱ्यावर असताना ही माहिती दिली आहे.
कोरोना व्हायरसमुळे दहावीचा भुगोलाचा शेवटचा पेपर घेण्यात आला नाही. भुगोलाचा पेपर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना इतर विषयांच्या लेखी परीक्षेच्या मार्कांची सरासरी काढून भुगोल विषयाचे मार्क देण्यात येतील. तसंच दिव्यांगांसाठी असणाऱ्या कार्यशिक्षण या विषयाचे मार्कही सरासरी पद्धतीनेच दिले जातील.
कोरोना व्हायरसच्या वाढता प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांचा भुगोलाचा पेपर बाकी होता. सुरुवातीला अनिश्चित काळासाठी हा पेपर पुढे ढकलण्यात आला होता, पण कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता, अखेर हा पेपर रद्द आला. कोरोना लॉकडाऊन सुरू होण्याआधी बारावीची परीक्षा संपली होती.