एकनाथ खडसे पुन्हा ED च्या रडारवर; कन्या रोहिनी अध्यक्ष असलेल्या सहकारी बँकेने दिलेल्या कर्जांची मागवली माहिती

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिनी खडसे-खेवलकर या अध्यक्ष असलेल्या जळगाव जिल्हा सहकारी बँकेला अंमलबजावणी संचलनालया (ED) कडून पत्र पाठवण्यात आले आहे. 

Updated: Aug 12, 2021, 07:49 AM IST
एकनाथ खडसे पुन्हा ED च्या रडारवर; कन्या रोहिनी अध्यक्ष असलेल्या सहकारी बँकेने दिलेल्या कर्जांची मागवली माहिती title=

वाल्मिक जोशी, जळगाव :  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिनी खडसे-खेवलकर या अध्यक्ष असलेल्या जळगाव जिल्हा सहकारी बँकेला अंमलबजावणी संचलनालया (ED) कडून पत्र पाठवण्यात आले आहे. 

ईडीकडून जळगाव जिल्हा सहकारी बँकेकडून माहिती मागवण्यात आली आहे. मुक्ताईनगर येथील साखर कारखान्यास दिलेल्या कर्जाबाबत ईडीने जिल्हा सहकारी बँकेला माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. 

एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी त्यांना अनेक चौकश्यांना सामोरे जावे लागले. याप्रकरणाचा  अद्यापही ईडी तपास करीत आहे. 

त्यानंतर ईडीचा ससेमिरा आता त्यांच्या कन्या रोहिनी खडसे-खेवलकर यांच्यापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. कारण जळगाव जिल्हा सहकारी बँकेवर अनेक वर्षांपासून खडसे यांचा दबदबा आहे. सध्या रोहिनी खडसे-खेवलकर बँकेच्या अध्यक्षा आहेत.

खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील साखर कारखान्यास जळगाव जिल्हा सहकारी बँकेने दिलेल्या कर्जाबाबत ईडीने आता माहिती मागितली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्यानंतर आता रोहिनी खडसेंच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.