Shinde Group MLA Schooled By Punekar: पावसाळा आणि वाहतुक कोंडी हे जणूकाही अतुट नातं असल्यासारख्या गोष्टी आहेत. सध्या मुंबई असो किंवा पुणे सगळीकडेच वाहतुक कोंडी पाहायला मिळते. त्यातच या वाहतूककोंडीचा त्रास कमी म्हणून की काय अनेकांना हॉर्न वाजवण्याची आणि वाटेल तशा गाड्या चालवण्याची सवय अनेकांना चीड आणते. पुण्यात नुकताच असा एक प्रकार घडला असून त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये एका पुणेकराने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील नेत्याला आणि माजी आमदारालाच वाहतुकीच्या नियमांवरुन भररस्त्यात खडेबोल सुनावले आहेत.
पुण्यातील रस्त्यावर गाडीचा सायरन वाजवत भरधाव वेगाने जाणारी गाडी पाहून एका पुणेकरांची चांगलीच सटकली. त्याने या कार चालकाला रोकलं आणि थेट 'सायरन का वाजवतोस? सीटबेल्ट कुठं आहे?' असा थेट प्रश्नांचा माराच सुरु केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आश्चर्याचा बाब म्हणजे चालकाच्या या बेशिस्त वागण्याने ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या मालकाची बोलतीच बंद झाली. अनोळखी पुणेकर चालकाला झापत असताना मालक गालावर हात ठेऊन सारा प्रकार पाहत कारमध्येच बसला होता. या व्यक्तीने पोलिसांच्या गाडीचा सायरन खासगी वाहनाला वापरला होता.
यामधील चकित करणारी बाब म्हणजे पुणेकर चालकाला झापत असताना निमुटपणे हे सारं ऐकून घेणारी व्यक्ती म्हणजेच कारचे मालक आमदार किशोर दराडे होते. पुण्यातील बाजीराव मार्गावरुन जाताना चालक सायरन वाजवत गाडी पळवत होता. या गाडीच्या पुढील बाजूला आमदार असं स्टीकर लावलेलं आहे.
कारच्या मागून जाणाऱ्या व्यक्तीने व्हिडीओ शुटींग केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. शूट करणारी व्यक्ती कारच्या बाजूला येते तेव्हा कार चालवणारी व्यक्ती अचानक गडबडीमध्ये सीटबेल्ट लावताना दिसते. त्यावर शूट करणारा पुणेकर, 'का रे बाबा आता सीटबेल्ट लावतो?' असं विचारलं. "सायरन वाजवत होता ना? सीटबेल्ट न लावता गाडी चालवत होतास. आमदार बसले तर सायरन वाजवायला कोणी परवानगी दिली?" असं या पुणेकराने विचारलं. त्यावर चालकाने कारच्या मागील सीटवर बसेलेल्या आमदाराच्या सुरक्षा ताफ्यातील पोलिसांकडे पाहिलं. यावरुनही पुणेकराने, "पोलिसांकडे काय बघतोस? आम्ही जनता आहोत. आम्ही निवडून देतो तेव्हा ते आमदार झाले आहेत," हे ऐकून आमदार किशोर दराडे स्मितहास्य करतात. पुढे बोलताना पुणेकर पुन्हा, "सायरन वाजवण्याची परवानगी कोणी दिली? सीटबेल्ट आता लावतो का?" असं विचारतो. मात्र समोरुन कोणी काहीच उत्तर देत नाही.
Ex - MLA Kishor Darade was spotted using Police Siren in his Private Vehicle
How someone can treat his Private Vehicle as a Government official vehicle
MH 15 HY 9119#AamchiMumbai #MumbaiRains #MLA #Pune #Mumbai #Rules pic.twitter.com/tmLBkfMaXm— Aamchi Mumbai (आमची मुंबई ) (@_Aamchi_Mumbai) August 9, 2024
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.