नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील ४२५ वाडी-वस्त्यांमध्ये खासदार डॉ. हिना गावित आणि आम्ही वीज पोहोचवली. दुरुन वीज आणावी लागत होती. हे देखील आमच्या सरकारने मंजूर केले आणि यासाठी आर्थिक निधीही मंजूर केल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर त्यांनी नंदुरबार येथे जनतेशी संवाद साधला. कोणतीही वस्ती अंधारात राहणार नाही. स्वातंत्र्यानंतर अनेक गावे रस्त्याने जोडली नव्हती. ती देखील आमच्या सरकारने जोडल्याचे ते म्हणाले.
यातील २२ हजार किमी रस्त्याची कामे पूर्ण केले. यातील ८ हजार किमी चे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून पूर्ण केल्याचे फडणवीस म्हणाले.
उज्वला योजनेअंतर्गत ३ लाख कुटुंबांच्या घरात गॅस देण्याचे तसेच वीज देण्याचे काम करण्यात आल्याचे ते म्हणाले.
आज ५० हजार आदिवासी विद्यार्थी नामांकीत शाळांमध्ये शिकत आहेत. त्यांची फी राज्य सरकारतर्फे भरली जात असल्याचेही फडणवीस म्हणाले.
नंदुरबार येथे जाण्याआधी सकाळी त्यांनी जळगाव येथे भाजप नेते एकनाथ खडसे आणि गिरिश महाजन यांची धावती भेट घेतली. तिघांनी एकत्र नाश्ता केला. यावेळी जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत तिघांमध्ये चर्चा झाली. जळगावमध्ये गेली २० वर्षे भाजपची सत्ता आहे. ही सत्ता उलथवून लावण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कंबर कसली आहे.