Shahaji Bapu Patil : शिंदे गटाचे 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सुप्रिम कोर्टात प्रलंबित आहे. त्यातच शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेचे 40 मतदारसंघ धोक्यात होते असा दावा शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. मतदारसंघ धोक्यात असल्याचा दावा करताना शहाजी बापू पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझ्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांचे मतदारसंघ धोक्यात आणण्याचे काम सुरू केले होते. शहाजी बापू पाटील यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्या कडून झालेल्या हालचालींचा मोठा गौप्यस्फोट केला आहे.
माझ्यासह आमदार महेंद्र दळवी, थोरवे, योगेश कदम, अनिल बाबर, प्रकाश आबिटकर यांच्यासह 40 जणांचे मतदार संघ धोक्यात आणायचे काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी कडून सुरू होते. पराभूत उमेदवाराच्या पत्रावर निधी देऊ लागले. माझे तर तिकीट धोक्यात होते. पण आता विक्रमी निधी माझ्या मतदारसंघात येत आहे. आता मला पाचशे जण पाडायला येतील. असे ही आमदार पाटील म्हणाले.
राज्यातल्या सत्तासंघर्षावर पुढच्या काहीच दिवसांत सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याची शक्यता आहे.. झी २४ तासनेच ही बातमी दाखवली होती. मात्र या निकालामुळे राज्यातली सत्ता समीकरणं बदलण्याबाबत चर्चा सुरु झाली आहे. भाजपला अजित पवारांचा पाठिंबा पुढच्या काळात मिळू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपनेही या चर्चा नाकारल्या आहेत.
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर जर शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरले तर राष्ट्रवादीची कोणतीही भूमिका नसेल असं मोठं विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. राज्य सरकारला धोका निर्माण झाला तरी राष्ट्रवादीची कोणतीही भूमिका नसेल असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.